Wednesday, December 8, 2010

आर्जव....

ते धुंद स्वप्न प्रीतीचे माझे तू उजळून जा,
या धुंद माझ्या प्रीतीत सदाही तू हरवून जा...

भावनांची धुंद माझ्या हो फुले तुझ्या गाली,
प्रीतीच्या गजरयात ही, फुले तू माळून जा..

बासरी मी, धून तू मधुर त्या बासरीची,
प्रीतीला या बासरीची मधुरता सांगून जा....

वसंत माझ्या प्रीतीचा फुलारला जीवनी,
वसंती या पुष्पासम सदाही तू बहरून जा...

--राजा जोशी

आठव..

सोबत आता आपुली, अशी कितीशी राहिली,
आयुष्याच्या मध्यान्ही, तिन्हीसांज जाहली...

ध्यास होता वादळाला कवेत घेण्याचा,
हातास आठवणींची, धूळ थोडी लागली..

आठवतो क्षण तो, जेंव्हा होतो आपण भेटलो,
पावसाने अंतरीची आग सारी जाळली...

भावनाचे पूर सारे, कधीच आटून गेले,
याद आली तुझी, मग पापणी ओलावली...

दूर गेले विश्व सारे, नुरले माझे न काही,
भरदिवसा पायतळी, वाट अन अंधारली...

--राजा जोशी

Tuesday, December 7, 2010

हार माझी ....

हार माझी ....

काय मी सांगू तुलारे, शब्द सारे संपले,
पोचवू भावना कश्या? भाव सारे आटले...

चांदण्या रात्रीतली मी धुंदी कधी न पाहिली,
अन स्पर्श निशावायुचे मज कधी न लाभले...

वाट सारी संपून गेली, पाय आता थांबले,
दूर क्षितीजावरी ते चंद्रबिंबहि लोपले...

मी करंटी आज, भार झाला माझा मला,
त्या दिव्यांनी का जळावे? प्राण जरी मी ओतले....

तू राहा तेथे सुखाने, आहेस जेथे राजसा,
विरहाने तुझ्या मग, हृदय जरी हे पेटले.....

--- राजा जोशी