Thursday, August 25, 2011

वेडे मवाळ होते........

येथे पराभुतांचे वसले महाल होते,
सत्यास दाम्भिकानी केले सवाल होते.........
सोडून लाज सारी, मुजरा स्वतःस करती,
उपकार जोखाणारे, त्यांचे हमाल होते.........
सत्यास जागणारे झाले इथे करंटे,
मागून वार केले ते सारे खुशाल होते.......
सत्ता इथे कुणाची, मग्रूर कोण झाले?
हातात तस्करांच्या सारे निकाल होते.......
आवाज शांततेचा, उठला असा त्रिलोकी,
दंशात प्रेरणेचे असणे जहाल होते........
होवून एक क्रांती, उखडून राज्य सारे,
आकाश जाळणारे, ते वेडे मवाळ होते........

Saturday, August 20, 2011

माझ्या अंतरात........

माझ्या अंतरात,
तुझी ओवी,
नकळत मनाला,
गुंतवून ठेवी......
माझ्या घरात,
तुझी पायधूळ,
पावलं मोजायचं,
माझं खूळ.......
गूढ एकांत,
ठसला मनात,
जगणं राहिलं,
तुझ्या ऋणात.......
तुटून गेले,
सारे बंध,
परके झाले,
फुलांचे गंध..........
वाणीत नाही,
उरला प्राण,
सुटतात शब्दांचे,
बोथट बाण......
क्षितिजावरची,
निळी रेघ,
रुंदावत जाणारी,
मनाची भेग......
माळेतील मोती,
ओघळून जावा,
धरता धरता,
हरवून जावा.......
जगणं असं,
उपऱ्या सारखं,
घराच्या फुटलेल्या,
खापऱ्या सारखं.......
ओलांडून जाताना,
नसलेल्या रेषा,
हरवून गेल्या,
जगण्याच्या दिशा......

Monday, August 8, 2011

पाय रुतलेले....

भावना दाटलेल्या,
सूर गोठलेले,
अनामिक काहूर,
मनात उठलेले......
तुझ्या आठवणी,
पोटात साठवून,
क्षितिजावर आकाश,
खाली झुकलेले....
ओंजळीतले पाणी,
सांडू नये म्हणून,
माझे दोन्ही हात,
घट्ट मिटलेले.....
चेहऱ्यावर तुझ्या,
लाघवी हसू,
माझे सारे,
गुलाब सुकलेले...
शब्दांची रास,
पुढ्यात पडलेली,
हवे ते मात्र,
शब्द चुकलेले.....
तुझी ओळख,
डोळ्यात जागवत,
माझे दिवस,
इथेच थांबलेले...
तुझ्यासाठी वाहताना,
जगण्याचे ओझे,
पुढ्यात उरलेत सारे,
डाव हरलेले....
कधीतरी येथे,
परत येशील म्हणून,
जगण्यात माझे,
पाय रुतलेले....

Wednesday, August 3, 2011

अर्ज निरोपाचा...

शोधिले आयुष्य सारे तुझ्या प्रश्नाच्या उत्तराला,
सुटलेल्या प्रश्नातून मग एक नवा प्रश्न आला.......

पेटलेले शब्द तुझे,  आयुष्य सारे विझवून गेले,
बोटांनी निखारयांच्या मग आधार मजला दिला....

उधारीच्या वहीतला तो शेवटचाच रकाना,
कर्ज माझ्या आयुष्याचे मला जाणवून गेला....

आजही होते मला तुला काही सांगायचे,
प्रत्यंचेवर चढण्या आधी भात्यात शब्द गेला.....

हातात आपल्या होते ते अर्ज निरोपाचे,
सदिच्छा देण्यास सारा पूर माणसांचा आला....