Tuesday, December 31, 2013

नूतन वर्ष

नूतन वर्ष आले आहे,

नवीन संधी घेऊन,
नवीन दारे उघडूया,
नवीन साहसे करून.....

झाले गेले विसरून जावू,
भूतकाळ मागे ठेवून,
वर्तमान काळ उजळूया,
भविष्य समोर ठेवून......

इच्छा तेथे मार्ग असतो,
स्वतःवर असुद्या विश्वास,
आत्मविश्वास असेल तर,
पाण्याखालीही घेता येतो श्वास..

मागे वळून पाहायचं नाही,
नवीन वाटा शोधायच्या,
कधीच हार जायचं नाही,
साऱ्या लढाया जिंकायच्या....

Friday, December 13, 2013

विरह…

असेल आठव तुजला, मी न विसरलो काही,
वादळात हरवली पाने वाऱ्यास बोललो नाही….

साक्षीस एक केवळ ते झाड पिंपळाचे,
पानात फक्त सळसळ, दोघेही बोललो नाही…

दोघात बंध होते, तुटले कसे अचानक,
मेघात गुंतली किरणे पण सूर्यास बोललो नाही……

भासे गतक्षणांची ओळख अजून ताजी,
अंधार सावलीचा पण दिव्यास बोललो नाही….

एकला आता असा मी, आयुष्य ओढतो हे,
शपथ परस्परांच्या, अजून विसरलो नाही…

Thursday, December 12, 2013

एकटा……

रस्ते कांही नवे मला तेंव्हा इथे उमजून गेले,
दारे सर्व बंद झाली हे जेंव्हा मला समजून गेले…

झुळुकीने एक हलक्या, प्राजक्त सारा गळून गेला,
पण राहिलेले एक फूल, झाडास साऱ्या सजवून गेले….

हल्ला तो परका नव्हता, मीच मजवर वार केले,
गाडण्या "मी" पणाला, ते सामर्थ्य माझ्यात रुजवून गेले…

आक्रोश नुसता भोवती, न कुठेही हास्य होते,
कोवळ्या अश्रूत सारे, मुखवटेही उखडून गेले…

जखमा जरी खोल होत्या, वेदना ना झाल्या कधी,
विसरण्या जगतास साऱ्या, एकटेपण रिझवून गेले…



Wednesday, December 11, 2013

बदल……

आजकाल डोळ्यांना खूप काही वेगळं दिसतंय,
मी तिथेच आहे तरी, जग मात्र बदलत जातंय…

आयुष्य पकडण्यासाठी, साऱ्यांची धावपळ आहे,
नवीन सारं सामावताना जुनं तसंच पडून राहतंय……

मनाची कवाडे कशी कायम खुली असायची,
घराचं दार सुद्धा आता कुलुपबंद होवून गेलंय…….

कालच आयुष्य जरा पुन्हा पाहायला गेलो होतो,
कळून चुकलं मागील सारं, कालौघात वाहून गेलंय ….

बरंच काही हरवून गेलंय, या साऱ्या प्रवासात,
आजचं नवं असणारंही, उद्यासाठी जुनं होतंय…

मी सुद्धा बदललो आहे, जगालाही पटलं असणार,
पण आतून मी तोच आहे, वरच फक्त आवरण गेलंय…

Tuesday, December 10, 2013

आयुष्य…….

नको पाहूस जगाकडे अशा तिरकस नजरेने,
केवळ दोष आणि दुर्गुण शोधण्यासाठी,
कांहीवेळा आपण अंधच असावे,
शोधावी फुलेच फक्त
काट्याकडे दुर्लक्ष करुन…
मेघाच्छादित रात्रीत सुद्धा एक किरण लपलेला असतो
स्वयंप्रकाशित ताऱ्याचा
त्या ताऱ्याला शोध,
लक्ष नको देवू सूर्यावरील डागाकडे….
नदीचा प्रवाह वाहत असतो,
अथांग सागराकडे,
सामावून घेतो तो,
नदीतले सारे सारे,
नाही लोटत मागे तो नकोसे प्रवाह,
त्यांना सामावून घेत,
नष्ट करतो त्यातले सारे विष,
नको जावूस प्रवाहा विरुद्ध,
आणि प्रयत्नहि करू नको त्याला थांबविण्याचा,
आत्ताच आला आहेस तू या जगात,
नदी सागराचे अस्तित्व तुझ्या खूप आधीपासूनचे आहे,
प्रत्येक संकटाला तोंड देत,
ते अजूनही अबाधित आहे,
जग तुझ्यासाठी बदलणार नाही,
किंवा नदी सागराकडून जमिनीकडे वाहणार नाही,
आयुष्यात संकटे हि यायलाच हवीत,
आपली खरी कुवत समजण्यासाठी,
परिस्थितीला सामोरे जा,
नको भिवून मागे फिरू,
आणि आयुष्य हि जग पाण्यासारखे,
भांड्याचा आकार कोणताही असो,
त्याचा आदर करून,
आणि त्याचाच आकार घेवुन….

Friday, November 29, 2013

आराधना…….

चांदनी अब भी जवाँ है, तुम अभी क्यूँ सो गए ?
रात भी भीगी नहीं, फिर उस तरफ क्यूँ मुड़ गए ?

आसमाँ के दीप सारे रोशनी बरसा रहे हैं,
तुम मगर क्यूँ बेखबर होकर यहाँ से चल दिए?

यह हवा कि हल्की लहेर पूछती हैं बार बार,
रजनीगंधा कि खुशबुको क्या कभी तुम ले गए?

उठ रही हैं दिलमे मेरे, खुशियोंकी धुंद लहरें,
तुम किनारोँ कि तरह क्यूँ सूखे सूखे रह गए?

Thursday, November 28, 2013

धूर…

ओल्या सरपणासारखं आयुष्य …….
पूर्ण जळतही नाही,
पूर्ण विझत पण नाही ……
आठवणींचा धूर डोळ्यात पाणी आणतोय,
एकटेपणान आसमंत भरून गेलाय ……
कोणी टोचत ही नाही,
कोणी समजावतहि नाही…
आज वारा सुध्दा पडलाय…
सडक सुद्धा निर्जिव.,
मेलेल्या सापासारखी……
पण अजूनही तिच्यात दाहकता आहे…
पोळून पोळून पाय जळून गेलेत,
चालण तरीही संपत नाही……
कुठं नेणार हा रस्ता मला,
अनंतात घेवून जावूदे……
नाहीतर फसवी वळणे घेत,
पुन्हा इथेच आला तर,
जखमा पुन्हा ताज्या होतील,
आणि ओघळू लागेल पुन्हा रक्त …
धुमसणाऱ्या आयुष्यावर सांडून,
पुन्हा उफाळून येईल,
आठवणींचा धूर…
आणि हरवतील दिशा……
कधीही न सापडण्यासाठी ……

Friday, March 1, 2013

अर्धा डाव.....

तिन्हीसांज झाली, सावलीही लांबलेली,
भेट अजून आपली, उंबऱ्यात थांबलेली......

किती ग्रीष्म गेले अन किती पावसाळे,
किती वादळेही आठवावी झुन्झलेली......

सारी सुखे सभोती जोडून हात दोन्ही,
स्वप्ने तुझ्याविना माझी दुभंगलेली......

कोणास साद घालू, सारे इथे निनावी,
नाती परस्परांची स्वार्थात गुंतलेली....

आयुष्य भोगले जे अर्धाच डाव होता,
अर्धीच ही कहाणी, कधीही न संपलेली......