Monday, March 24, 2014

खासदार.....

पाच वर्षातून मला, एकच दिवस मोकळा मिळतो,
मायबाप, म्हणून तर मी आत्ता तुमच्या दारात येतो.....

दर निवडणुकीत, तुम्ही मला निवडून देता,
पाच वर्ष दिल्लीला मजा करायला पाठवता.....

संसदेत कसं थंड थंड वाटत असतं,
खाणं पिणं सुद्धा, एकदम स्वस्त असतं....

अधिवेशन चालू असताना मज्जाच मज्जा असते,
कितीतरी वेळा तिथे मारामारी करायला मिळते.....

भाषण चालू असेल तरी, हवं तर ऐकायचं,
कंटाळा आलातर खुर्चीतच, मस्त ताणून द्यायचं....

खरतर तिथ, काम असं काहीच नसत,
पण भत्ता बुडेल म्हणून, रोज रोज जावं लागतं....

अधिवेशन संपलं कि तडक इकडे येतो,
कुठ कुठ सेटिंग करायची, जरा पाहून घेतो....

कुठतरी रस्ता, कुठतरी पुलाच काम असतं,
अशी मोठी कामं, हेच आमचं इन्कम असतं.....

सांगा त्या खासदाराच्या पगारात काय येतंय?
अहो कमिशन खाताना पण, डोकं चालवाव लागतंय......

कोणजाणे कोणीतरी, स्टिंग ऑपरेशन करील,
खाल्लेलं सगळं, बकाबक बाहेर येईल.....

इतका पैसा सांभाळायचा, काय गम्मत आहे?
पैसा कसं जिरवायचा, हेच खरं इंगित आहे.....

कुठही मला पकडून दाखवा, हे ओपन च्यालेंज आहे,
सीबीआय काय? आख्खं सरकार आपल्या खिशात आहे.....

एव्हढी कामं असताना, सांगा कधी इकडे येऊ?
पाच वर्षांनी जायचच आहे, म्हटलं तेंव्हा भेटून येऊ.....

तुमचं तुम्हाला पुरत नाही, मग मला काय देणार?
मग कंत्राटदाराच्या खिशातून, तुमचे पैसे घेणार.....

अहो नाही कामं झाली, उगाच कशाला बोंबलायच,
आपल्या लोकशाहीत, हे असंच चालायचं.....

तुम्ही फक्त मत द्या, दुसरं काही मागणार नाही,
तुमच्या दारात परत पाच वर्ष येणार नाही.......

हुरहूर.....

बहरेल का नव्याने, वेल ही रे वाळलेली,
सारी सुखे उशाशी, अंतरी पण पोळलेली...

तुझ्या मंदिरात देवा, लाचार रोज जमती,
मला कधी कशाची, आस नव्हती लागलेली.....

गंधास मोगऱ्याच्या, जरी नेई लुटून वारा,
लुटण्या सुगंध त्याचा, मी बाग लावलेली.....

होते घरात सारे, नव्हती कमी कशाची,
नव्हतास फक्त तू, ती हुरहूर लागलेली.....

गंतव्य तेच होते, अन रस्ते समान होते,
नव्हती पराभवाला हि पावले सरावलेली....

समईत ज्योत जळते, तेलाविनाच आता,
भरली तिच्यात आसवे विरहात पोळलेली........

Friday, March 21, 2014

निसटलेली पाने...

जेंव्हा वळून मागे, गत आयुष्य जरा पाहिले,
समजले तेंव्हा मला, जगणे बरेच राहिले.....

दारातला पारिजात, मुक्त उधळी सुगंध फुले,
रस्त्यात काटेरी फुलांचे बाजार तरीही पाहिले.......

पूर तो येता नदीला, बंध ना रुचला कधीही,
वठलेले झाड वेडे, तीरावरतीच राहिले.........

सांजवेळी चांदण्यांची झुंड आकाशी पोचली,
हिरमुसले चंद्रकिरण, मेघाआडच राहिले.......

मी तुला का बोलाविले, कधीही न कळले मला,
दूर जात्या पावलांनी, सारे मग समजाविले... ....

ना कुठेही खूण छोटी, ना कुठे अस्तित्व होते,
पान पुढचे उलटताना, मागचे मिटत राहिले....

Thursday, March 20, 2014

कळे ना कसे....

विश्व माझे तूच अन, मी फक्त याचक होतो,
लिहिले तू आयुष्य सारे, मी फक्त वाचक होतो.....

एक छोटी रेघ ती ओढलीस तू शब्दावरी,
ओरखडे मनावरचे, मी उगाच मोजत होतो....

रंग तू सजवले किती, मज कधी न का भावले,
रात्रीच्या अंधारात मी, रंग खरा शोधत होतो.....

जाहली निष्पर्ण राने, सावली न उरली कुठे,
थेंब घामाचे माझ्या त्या तरुना पाजत होतो.......

माळलेली गजर्यातली, फुले सारी सुकून गेली,
मी तरी त्यांच्याकडे, गंध का मागत होतो....

उमगले ना आयुष्य हे, तुजवीण जगलो कसा?
प्रतीक्षेत मरणाच्या, आयुष्य सारे जागत होतो.... ,

Wednesday, March 19, 2014

घर........

असेल हे घर छोटे, असेल ओसरीही छोटी,
माणसे या घरातील मनाने पण खूप मोठी.....

नसतोच प्रश्न येथे, कोणता रे धर्म तुझा,
भावते सर्वांनाच माणुसकीची जात मोठी.....

येती लुळे पांगळे ही, आधार साऱ्यांना इथे,
लागली येथे कधी ना, अंधास आधार काठी......

पोरके वा टाकलेले, वाटून सारे घास घेती,
हे तुझे, हे माझे, या कल्पनांना मूठमाती.....

माणसांचे बुरुज येथे, झेलण्याला वार सारे,
रक्षति चहुबाजूनी, माणुसकीच्या चार भिंती... ..

दुर्दम्य आशेचा इथे, दीप सदाही तेवतो,
निश्चयाचे तेल आणि प्रयत्नांच्या वाती......

"ऐकणे" आणि "ऐकून घेणे" ( Hearing and Listening )

एखादी गोष्ट "ऐकणे" आणि "ऐकून घेणे" यात प्रचंड फरक आहे. ऐकणे या क्रियेत फक्त कान हा एकाच अवयव कार्यरत असतो, तर ऐकून घेणे या क्रियेत कान, मेंदू आणि मन, या गोष्टी कार्यरत असतात. त्यामुळेच बऱ्याच अशा गोष्टी आपल्याला काही काळानंतर आठवत नाहीत. त्या आपल्या Short Memory मध्ये जातात आणि नंतर पुसून जातात. पण जेंव्हा एखादी गोष्ट आपण नीट ऐकून घेतो, त्यावेळी आपला मेंदूपण सक्रिय असतो आणि अशा गोष्टी आपल्या कायमच्या लक्षात राहातर आणि त्या गोष्टींचा आपल्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतो. ऐकणे या प्रकारात आपण त्या बोलण्यातील आपल्याला सोयीस्कर भाग आपण घेतो, विशेषतः असा भाग जो आपल्याला प्रिय असतो किंवा आपली प्रिय व्यक्ती, वस्तू यांच्याशी निगडीत असतो. पण ऐकून घेणे या क्रियेत विषय कशाशीही निगडीत असो, आपल्या लक्षात राहतो. हा मानवी स्वभाव आहे.


खूप वेळा ऐकणे या प्रकारामुळे लोकांबद्दल गैरसमज निर्माण होतात. समज "क्ष" ही व्यक्ती "य" या व्यक्तीबद्दल बोलत असेल, तर आले "य" शी काय नाते आहे, आपले त्याच्याशी कसे संबंध आहेत याच दृष्टीने आपण विचार करतो आणि आपली प्रतिक्रिया हि तशीच असते. जर "य" बरोबर आपले संबंध जिव्हाळ्याचे असतील, तर त्याच्याबद्दल वाईट बोललेले आपल्याला सहन होत नाहीत. पण समजा त्याच्या बरोबरचे आपले संबंध चांगले नसतील, तर त्याच्या बद्दलचे चांगले बोलणे आपल्याला सहन होत नाही. "ऐकून घेणे" या क्रियेमध्ये आपली भूमिका तटस्थ असावी, त्यामुळे व्यक्ती किंवा वस्तू बद्दल नेमके काय चांगले आणि काय वाईट याचा अंदाज आपल्याला घेता येतो. एखाद्या अतिशय चांगले संबंध असलेल्या व्यक्तीचे नकारात्मक गुण आपल्याला माहित नसतात. तसेच एखाद्या व्यक्तीबद्दल आपण फक्त वाईटच ऐकलेले असते, त्याची सकारात्मक बाजू आपल्याला माहित नसते. ऐकून घेण्याच्या सवयी मुळे आपल्याला सर्व बाजू माहित होतात.

जेंव्हा आपण ऐकून घेत असतो, तेंव्हा त्या व्यक्ती बरोबर आपला संवाद होतो, बोलणे नाही. संवाद आणि बोलणे यातही खूप फरक आहे. संवादामुळे विचाराची देवाण घेवाण होऊ शकते, बोलण्याने वाद होतात. आणि एकदा वाद सुरु झाला कि विचारांची देवाण घेवाण संपते, आणि एकमेकाची उणी-दुणी काढणे सुरु होते आणि असे बोलणे कधी व्यक्तिगत पातळीवर येईल याची खात्री नसते.

नेतृत्व हा गुण विकसित होण्यासाठी "ऐकून घेणे" हा गुण अतिशय महत्वाचा आहे. नेत्याला एखादा निर्णय देताना घटनेच्या दोन्ही बाजू तितक्याच माहित असायला हव्यात. नाहीतर निर्णय चुकू शकतो आणि त्याचे खूप दूरगामी परिणाम होवू शकतात.

प्रत्येक पालकाने आपल्या मुलांमध्ये "ऐकून घेणे" ही कला विकसित करायला हवी आणि ते अतिशय महत्वाचे आहे. कारण या मुलांतूनच उद्याचे नेतृत्व पुढे येणार आहे.

Tuesday, March 18, 2014

करावे तसे भरावे...

आपलं आयुष्य हे प्रतिध्वनी सारखं असतं. जे आपण देतो, तसंच आपल्याला फळ मिळतं. जमिनीत जांभळाच झाड लावलं, तर त्याला आंबे नाहीत येणार.... जसं आपण दुसऱ्याशी वागतो, तशीच आपल्याला वागणूक मिळते.


एका गावात एक शेतकरी एका बेकरीवाल्याला रोज १ किलो लोणी देत असे. असं बरेच वर्ष चालू होतं. एकदा त्या बेकारीवाल्यान विचार केला, हा आपल्याला रोज एक किलो लोणी देतो आणि आपण घेतो. कधीतरी त्याचे वजन करून पाहू. म्हणून त्याने एकदा लोण्याचे वजन केले. ते १ किलोपेक्षा कमी भरले. त्याने त्या शेतकऱ्यावर फिर्याद दाखल केली. न्यायाधीशाने शेतकऱ्याला विचारले, काय रे तू याला रोज १ किलोपेक्षा कमी लोणी देतोस हे खरे आहे काय? शेतकरी बोलला, सरकार, मी निरपराध आहे. जर ते लोणी १ किलोपेक्षा कमी भरत असेल, तर त्याचा दोष बेकरीवाल्याकडे आहे. माझ्याकडे वजन काटा आहे, पण प्रमाणित वजन नाही. मी रोज या बेकरीवाल्याकडून १ किलोचा पाव घेतो आणि तो पाव एका पारड्यात ठेवून लोणी वजन करून देतो. जर पाव १ किलो पेक्षा कमी असेल, तर लोणीही कमीच असणार.... त्यामुळे खरा दोषी तो आहे, मी नाही.

आपल्या चांगल्या कामासाठी दुसऱ्यांनी आपले कौतुक करावे, स्तुती करावी असे प्रत्येकालाच वाटत असते आणि त्यात चूक काही नाही. पण अशावेळी आपण दुसऱ्यांच्या चांगल्या गोष्टीचे कौतुक किती करतो हे पण लक्षात घेतले पाहिजे. एखाद्या चांगल्या गोष्टीचे योग्यवेळी ( म्हणजे लगेचच ) कौतुक करणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला चांगले काम करायचा हुरूप येतो. केलेल्या कामात चुका काढणे प्रत्येकालाच येते. पण त्याचे कौतुक करणे सर्वांनाच जमत नाही, कारण त्याला वेगळी मानसिकता लागते. येथे खुपदा इगो आडवा येतो. आपले मन खुले असावे. कौतुकाचे शब्द बोलायला पैसे पडत नाहीत. पण पैशापेक्षा श्रीमंत असे मन मात्र असावे लागते.

सद्गुणाकडे पहा, दुर्गुण दुर्लक्षित करा....

आयुष्यात आपल्याला आपल्याभोवती शेकडो माणसे दिसत असतात. सगळीच परिचयाची नसली, तरी कित्येक परिचित असतात. या परिचित लोकात प्रत्येकाशी आपले जमते का? नाही, कधीच नाही. कधी आपल्याला त्या माणसातील एखादा दुर्गुण खुपत असतो, कधी आपल्यातील त्यांना. या जगात कोणीही केवळ सद्गुण घेवून जन्माला येत नाही. गुलाबाचं फुल काट्यात असतं, कमळ चिखलात असतं...... पण आपण या एखाद्या दुर्गुणामुळे आपल्यात एक अदृश्य भिंत तयार करतो आणि ती ओलांडण्याची आपली मानसिकता नसते. आपण तसा कधी प्रयत्नहि करत नाही. आणि या गोष्टीमुळे आपण कितीतरी चांगल्या व्यक्तींच्या सहवासाला, मैत्रीला मुकतो. आणि याचवेळी, आपल्यातही काही दुर्गुण आहेत हे मान्य करत नाही.




आंड्र्यू कोर्नेजी जेंव्हा स्कॉटलंडहून अमेरिकेला आला, तेंव्हा एक सामान्य तरुण मुलगा होता. मिळेल ते काम करायचा. पण नंतर तो अमेरिकेतील सर्वात मोठा पोलाद उत्पादक बनला. त्याच्या कडे १९२० मध्ये ४३ लक्षाधीश काम करत होते. विचार करा १९२० मध्ये..... त्यावेळी ती किती संपत्ती होती... कोणीतरी त्याला विचारले, तू माणसांशी कसे वागतोस? यावर त्याने दिलेले उत्तर विचार करायला लावणारे आहे. तो म्हटला, जेंव्हा तुम्ही खाणीतून सोने काढता, तेंव्हा तुम्हाला कित्येक टन माती काढावी लागते मगच काही ग्रॅम सोने मिळते. याच अर्थ असा आहे का कि तुम्ही माती खोदता? नाही. तुमचा लक्ष्य सोने असते, माती नाही. मी माणसातले सद्गुण बघतो, दुर्गुण नाही....



आपण नेमके याच्या विरुद्ध करतो, आपले पहिले लक्ष जाते त्याच्यात वाईट काय आहे याकडे. हे टाळून जर आपण माणसातील सद्गुण पाहून दुर्गुणाकडे थोडे दुर्लक्ष केले. तर तोच माणूस तुम्हाला नव्याने पाहायला मिळेल, त्याची उपयोगिता कळेल, माणसामाणसातले संबंध दृढ होतील....

Monday, March 17, 2014

शेवट......

केली इथे लोकहो, आज गर्दी हि कशाला?
चाललो आहे आता मी, अनंताच्या दिशेला.......

मिळणार काय आहे, येथे जमून तुम्हा?
दमडी खिशात नाही, प्राशण्याशी विषाला...

यादीत काल तुमच्या, होतो उपेक्षिताच्या,
स्पर्शून पाय माझे, का विटाळता स्वतःला?

जगणे जगून गेलो, मी सर्व एकट्याने,
देवू नका हा खांदा, माझ्या आता शवाला........

सजवू नका फुलांनी निष्प्राण देह माझा,
शेवटी त्या फुलांचे उपकार हो कशाला?

त्या एकटेपणाने, मज सोडले ना कधीही,
त्यालाच देवूद्याहो अग्नी आता चितेला....

गझल....

माझिया स्वप्नांचा प्रवास झाली गझल,
कधी स्पंदने, कधी श्वास झाली गझल.....

श्रावणात रंगला खेळ धरती अन पावसाचा,
हळुवार उन हळदीचे उधळूनी गेली गझल......

श्वासात तुझिया मारवा, ऐकला कित्येकदा,
उधळूनी फुले स्वरांची बहरून गेली गझल....

असलो जरी कुठेही, विश्वात मी हरवलेला,
जवळी असेल माझ्या ही प्रीत वेडी गझल.....

( No. 100 )

श्रावण.....

श्रावणातल्या रिमझिम धारा अवचित उतरून आल्या,
मनातल्या त्या तुझ्या आठवणी मग ओसंडून वाहिल्या.....

अशाच एका धुंद धुंद अन ओल्या सायंकाळी
प्रीतीची प्रतिमा उतरली निर्मल निर्झर जळी,
थेंब थेंब पानात उतरले, जाहल्या चिंब भावना ओल्या.....

धरतीच्या अंकावर पहुडले उन कोवळे सोनेरी,
इंद्रधनूची पहात अवखळ गगनी उंच भरारी,
गंधास ओल्या आलिंगन देता, थरथरल्या पाकळ्या........

गेले बरसून श्रावण किती, मी अजून व्याकुळलेली,
हृदयाच्या अंतरात लपवली मी दुःखे साकळलेली
सुगंध न उरला आता जीवात या सुकलेल्या....

संघर्ष.....

माणसाचं आयुष्य हे संघर्षानं भरलेलं आहे. जन्माला येण्यापासून ते मृत्यू पर्यंत त्याला अविरत संघर्ष करावा लागतो. पण या संघर्षानच त्याचा आयुष्य धारदार बनत, त्याला कोणत्याही संकटाला तोंड देण्याची शक्ती या संघर्षानच मिळते. साधे उदाहरण घ्या. आपण रस्त्यावर वाहन चालवतो. प्रचंड गर्दीत, रस्त्यावरून वाहने आडवी तिडवी जाताना, मधेच एखादा दुचाकीस्वार आपले कौशल्य दाखवतो, कोणीतरी " हा रस्ता केवळ आपल्यासाठीच आहे " असे समजून रस्ता पार करायला मध्ये घुसतो.... या सगळ्याचा अनुभव घेत घेत आपण एक कौशल्यपूर्ण चालक बनतो.. हा रहादारीशी आपला एक संघर्षाच असतो. त्यातून तावून सुलाखून बाहेर पडलो कि आपला उत्कृष्ठ चालक बनतो. पण आपण रहदारी आहे म्हणून वाहन चालवलेच नाही तर? तर आपण परावलंबी होतो. बाहेर जाण्यासाठी कोणावर तरी आपल्याला अवलंबून राहावे लागते आणि हे आपली कमजोरी आयुष्यभर रहाते.


एकदा एका महाविद्यालयात जीवशास्त्राचा तास सुरु होता. प्राध्यापक शिकवत होते, " सुरवंटाचे फुलपाखरू कसे होते".. त्यांनी वर्गात एक कोष आणला होता, ज्यातून एक फुलपाखरू बाहेर पडत होते. त्या फुलपाखराची धडपड चालली होती त्या कोषातून बाहेर येण्याची. प्राध्यापकांनी सांगितले, हे फुलपाखरू कसे बाहेर येते ते पहा, तो पर्यंत मी बाहेर जावून येतो. पण कोणीही त्या फुलपाखराला किंवा कोषाला हात लावायचा नाही. आणि ते बाहेर गेले.

मुले निरीक्षण करत होती, ते फुलपाखरू आपली सारी शक्ती पणाला लावून त्या कोषातून बाहेर यायचा अथक प्रयत्न करीत होते, पण त्याला बाहेर येणे जमत नव्हते. त्या विद्यार्थ्यातील एकाला तो संघर्ष पाहवला नाही आणि त्याने त्या कोशाचे आवरण थोडे बाजूला केले. फुलपाखरू सुखरूप बाहेर आले, पण काही वेळातच ते मेले.

प्राध्यापक वर्गात आले आणि त्यांनी विचारले, फुलपाखरू आले का बाहेर? त्यावर विद्यार्थ्यांनी घडलेला प्रसंग सांगितला. त्यावर प्राध्यापक म्हणाले, हे मला अपेक्षितच होते. जेंव्हा ते फुलपाखरू कोषातून बाहेर यायचा प्रयत्न करीत होते, त्याच प्रयत्नांनी ते सुदृढ बनत होते, त्याच्यात शक्ती निर्माण होत होती, ती शक्तीच तुम्ही नष्ट केली. फुलपाखराच्या काही दिवसांच्या आयुष्यात हा कोषातून बाहेर येणारा संघर्षच त्यांना ताकदवान बनवतो. तो संघर्षच तुम्ही थांबवला, त्यामुळे त्याचा मृत्यू अटळ होता... तुमची सहानुभूती त्याचा जीव जाण्याला कारण ठरली. प्रत्येकवेळी सहानुभूतीनेच माणसाला बाल मिळते असे नाही, तर त्याला संघर्षासाठी दिलेल्या उत्तेजनाने तो संघर्षावर मात करू शकतो.

संघर्षावर मात करून मिळवलेले यश माणसाला आत्मविश्वास, समाधान आणि आनद देवून जाते. एक कोटीची लॉटरी लागणे कोणाला नको असते? पण जर एक कोटी रुपये पगार मिळाला, तर त्याचा आनंद अधिक असतो. जगात कोट्याधीश कोटीने आहेत. लॉटरीमुळे त्यात फक्त एकाची भर पडली. पण महिन्याला किंवा वर्षाला एक कोटी पगार घेणारे किती आहेत? हाच तो फरक आहे.

मी मध्यंतरी जग प्रसिध्द लेखक शिव खेर यांचा माझ्या कंपनीने केलेला प्रशिक्षण वर्ग केला. रोज सकाळी आम्हाला ते तुम्ही या वर्गात शिकलेल्या गोष्टी अमलात आणण्याचा काय प्रयत्न केला हे विचारायचे. त्यामध्ये माझ्या एका सहकार्याने सांगितलेला अनुभव खूप काही सांगून जातो. त्याला ५-६ वर्षाची मुलगी आहे. एक दिवस तिला उंचावर ठेवलेले एक खेळणे हवे होते. जागा खूप उंच नसली, तरी तिच्यासाठी ती उंचच होती. तिने खेळणे आईकडे मागितले. आई ते तिला देणार इतक्यात तो सहकारी म्हणाला, थांब, मी बघतो. त्याने तिला विचारले, तुला ते खेळणे का काढता येत नाही? तिने स्वाभाविक उत्तर दिले, ते उंचावर आहे, माझा हात पोहोचत नाही. मग तो म्हणाला, जर तुझा हात तिथपर्यंत पोचला, तर तू स्वतः ते काढशील का? मुलगी म्हणाली, हो. मग त्याने तिला घरातले स्टूल आणायला सांगितले. ते खेळण्याजवळ ठेवून तिला त्यावर चढवले ( तिला उंच स्टुलावर एकटीला चढणे शक्य नव्हते ). आणि खेळणे काढायला सांगितले. तिने ते काढले आणि ते तिने स्वतः काढले याचा तिला इतका आनद झाला कि दिसेल त्याला ती सांगत होती कि खेळणे तिने काढले. याला म्हणतात संघर्षातून मिळालेले समाधान. Joy of achievement ...

आपल्या भारतात असेच कांहीसे घडत आहे. म्हणजे " राखीवजागा " या गोष्टीचा मुल उद्देश बाजूला पडून त्याचा आता उपयोग आता मतासाठी आपले निर्लज्ज राज्यकर्ते करीत आहेत. बाबासाहेबांचा यामागचा हेतू काय होता हे कोणीच ध्यानात घेत नाही. वंचित वर्गाला मुख्य प्रवाहात आणणे हा त्याचा हेतू होता. परंतु आज ६५ वर्षे झाली, तरीही तो हेतू साध्य झाला नाही. उलट रोज रोज नवीन धर्म, जाती जमाती आरक्षण मागताहेत. आरक्षण हे वरील गोष्टीतील स्टुला सारखे वापरायला हवे. ते हि जसे लहान मुलीसाठी वापरले, तसे. मोठे झाल्यावर सुद्धा जर तिने स्टूल मागितले, तर काय होईल? आज आरक्षित लोकांना कोठेही संघर्ष करावा लागत नाही. शिक्षणात आरक्षण, नोकरीत आरक्षण... त्यामुळे त्यांच्यातील झुंझार वृत्तीच नष्ट झाली आहे. आणि त्यामुळे अजूनही त्यांना राखीव जागेच्या कुबड्या लागतात, कारण आत्मविश्वास नाही... जेंव्हा माणूस पोहायला शिकतो, तेंव्हा सुरुवातीला बंद डबा, हवेची ट्यूब वगैरेचा आधार घेतला जातो. पण हा आधार असतानाच त्याने हात पाय मारायला शिकले पाहिजे. ट्यूब मुळे आपण तरंगतो हेच जर मनात ठसले गेले, तर तो पोहायला कधीच शिकणार नाही आणे ट्यूबचा आधार गेला, तर पाण्यात बुडून मृत्यू अटळ आहे...

याउलट, जो वर्ग आरक्षणरहित आहे, अशनी आपली प्रगती खूप केली, कारण त्यांनी संघर्ष केला, संकटाना, वाईट परिस्थितीला तोंड देण्याची त्यांच्यात ताकद आली.....

तेंव्हा संघर्षाला घाबरू नका, असा संघर्ष तुम्हाला अजून बलवान होण्यास मदत करेल....

Monday, March 10, 2014

गारपीट.....

धगधगणाऱ्या गारपिटीचा धोंडा उरावर बसवून,
परमेश्वरपण मजा बघतोय, लक्तरांचे धागे उसवून.......

यंदाच बरसलं होतं जरा पाऊसपाणी निगुतीनं,
रानपण तरारली होती दुष्काळाचे दिवस विसरून......

आशा होती मनात, लेकरं जरा सुखी होतील,
काही क्षणातच गेली पण, सारी स्वप्नं करपून....

गारा नव्हत्याच त्या, जणू पेटलेले कोळसे होते,
तोंडातला घास असा, नियतीनं नेला हिसकून....

ज्यानं तारायचं असतं, त्यानंच पुरतं नागवल,
लज्जेची चिंधी सुद्धा त्यानं काढली उपसून.....

येतील स्मशान शोधत, समाजसेवकांचे मुखवटे,
पण द्याल का हो पोटाला ताटातला घास काढून?

फेकेल सरकार मदतीचे उरलेले दोन चार तुकडे,
सादवेल जगात सारे, उपकार मात्र ढोल बडवून...

बाजार आमच्या प्रेतांचा, ढाळ्तील सारे नक्राश्रू,
अन चितेवर भाकरी भाजून, येतील मग निवडून.....

माहित आहे "दिल्या" शिवाय इथे काही मिळत नाही,
मुडद्याच्या टाळूचे लोणी, नेतील मग खिश्यात भरून....



सांज.......

नभात उगवला शशी, सुहास्य वदनी कोमल,
पौर्णिमा धुंदीत हसली, पाहुनी ते किरण शीतल....

शांत शांत पावन येतसे उधळीत हा गंध धुंद,
डोलवतो पुष्पास साऱ्या वाहताना संथ संथ,
रोमांचले अजाणताच, रातराणीचे तनु कोमल....

शशीसवे हासताना तारका या तारांगणी,
रक्तिमा लज्जेचा दिसे तव मुखाच्या प्रांगणी,
आतुरलेला इथे असा मी, सखे तुझाच श्यामल......

अंतरी उमललेल्या प्रीतीच्या या भावनांना,
तुझीच आहे प्रतीक्षा, तुझीच आहे कामना,
विश्व माझं भावनांच, तूच आहे व्यापलेलं...........



.

जगणं....

आयुष्य जगायचे दोन मार्ग असतात,
जे मिळाले आहे,
त्यातच मानायचे सुख,
किंवा,
जे हवं आहे ते मिळवायचं,
स्वतःच्या हिमतीवर....
जगायचं तर संघर्ष आलाच......
आणि संघर्षच देतो खरा आनंद "जगण्याचा"....
संघर्षाशिवाय नाही आयुष्य "जगता" येत,
ठरव मनाशी नीटपणे,
आयुष्य "जगायचं" कि "घालवायचं",
दगडाला "दगड" म्हणूनच जगायचं असेल,
तर त्याला उपेक्षितच रहावं लागतं....
तक्रार नसते त्यानं करायची पायदळी तुडवले जाण्याची.....
पण त्याला जर व्हायचे असेल "शिल्प",
तर तयारी लागते छिन्नीचे घाव सोसायची....
त्यागावा लागतो स्वतःचा कठोरपणा...
आणि व्हावं लागतं लोण्यासारखं मऊ,
जगणंही खूप काही शिकवून जातं......
आणि शिकता शिकता आयुष्य बहरत जातं.....
वाट नसती पहायची संधीची...
ती आपल्या जवळच असते,
ती ओळखायची असते,
जा थेट प्रश्नाच्या अंत पर्यंत..
नको सोडू कांहीच अर्ध्यावर...
लक्षात ठेव,
प्रश्न प्रत्येकाला असतात...
पण उत्तराशिवाय कधीच प्रश्न असत नाही,
आणि बहुतेकवेळा,
प्रश्नातच उत्तर लपलेलं असतं....

Thursday, March 6, 2014

बाळा.......

तुझ्या पावलांनी, तू चालताना,
किती मोद होतो तुला पाहताना....

तुझा जन्म झाला, मी धन्य झाले,
तुझी हाक " आई ", मी ऐकताना...

बोबडे बोल जणू घडे अमृताचे,
ठेविते जपुनी त्या, रुपेरी क्षणांना....

खळी गोड उमटे, गालावरी तुझ्या,
जाणवी तुझ्यावीण माझा रितेपणा....

तुझे रुपरंग राजा असुदे कसेही,
हरेक देवकीला, असे प्रिय कान्हा....

देवा तुझ्याकडे मागू अजून काय?
दिला जीवनाला तू माझ्या पुरेपणा....



अवेळ......

तुला वाटायचं,
मी काहीच बोलत नाही,
माझी तक्रार होती,
तू काहीच ऐकत नाहीस....
असेच दिवस सरून गेले,
एकमेकांना शोधण्यात,
आपण जातच राहिलो, पुढे..... पुढे....
जगणं तसंच मागे ठेवून......

आता तुला मला ऐकायचंय,
पण मला काहीच सांगायचं नाहीय,
कालपर्यंत तू मला हवा होतास,
आता मी तुला हवी आहे......
भौतिक सुखा पलीकडे असतात काही गोष्टी,
प्रेम,
भावना,
ओढ.....
तुला कधी जाणवलंच नाही.......

दिवस सरत गेले....
मीही बदलत गेले......
आज तुला मला ऐकायचंय.....
पण मला काहीच सांगायचं नाहीय.....
अवेळी पडणाऱ्या पावसानं,
असतील धरणे भरत.....
पण शेतातलं उभं पीक जमीनदोस्त होतं....
पाणी तेच असतं रे......
फरक पडण्याच्या वेळेत असतो.....
नाहीतर जिवंत माणसाला बुडवणाऱ्या त्याने,
प्रेत नसतं तरंगत ठेवलं.........

विषण्ण.....

आरसे सारे इथे दगाबाज होते,
चेहऱ्यावरी चेहऱ्यांचे साज होते......

नदीला गटारेच जीवदान देती,
कोरडे किनारेहि घरंदाज होते.......

उध्वस्त करणे असे पावसाचे,
कुशल इथे सर्व कामकाज होते.....

चुरडून कोणी उमलत्या कळीला,
दहशतीत दाबलेले आवाज होते.....

इथे माणसाची विक्री खुल्याने,
चुकले भल्याभल्यांचे अंदाज होते......

तारण्या मला मी एकटाच उरतो,
सुर्योदयास येथे तिन्हीसांज होते....

Wednesday, March 5, 2014

शोध....

हरवलेले घर माझे, मी निरंत शोधीत आहे,
दिशाहीन वाऱ्यालाही का ठाव विचारत आहे.......

नव्हतो कधीच क्षणभर मी रहावयास येथे,
रस्ता तरी कसा मग ओळखीचा वाटत आहे......

उन्माद वादळाचा, त्याला सामील लाट मोठी,
शांत गंभीर किनारा, त्याला आवरत आहे......

अजून किती चालायचे? राहिल्या मागे दिशा,
क्षितिजावर तारा अजूनही वाट दाखवत आहे....

ओंजळीत तुझ्या होती, सुकलेली बकुळफुले,
अजूनही वेडा वारा, त्याचा सुगंध मागत आहे....

सजवून ठेविली आहे, माझी चिता इथे मी,
मृत्यू पण का मजला नेण्याचे टाळत आहे?

Tuesday, March 4, 2014

प्रश्न....

वाट सरळ होती, माझाच रस्ता चुकला होता,
मखमली हिरवळीवर, पायात काटा रुतला होता.........

दोनच थेंब पावसाचे, पण आयुष्य भिजून गेले,
येणारा प्रलय, त्या दोनच थेंबात लपला होता......

मरणाला का दोष देवू, आयुष्यच संपले होते,
जिवंतपणी मरण्याचा खूप अनुभव घेतला होता....

माझे येथे काय होते? रिकामा तर आलो होतो,
आठवणसुद्धा नेण्याला, तू मज्जाव केला होता.......

मला सुद्धा आता काहीच मागे ठेवायचे नाही,
साऱ्यांनाच प्रश्न पडावा, " हा खरंच जगला होता? "