Tuesday, January 28, 2014

दोष.......

दिलासा मला तू देवू नको रे,
उरले कुठे रे सागराला किनारे....

उधळून हा डाव सारीपटाचा,
हातात माझ्या फासे नकोरे....

वेचले एकेक मी थेंब पावसाचे,
आता झोपडीचा निवारा नको रे....

केसात माळून फुले मोगऱ्याची,
गंधित वारे जवळी नको रे....

जाळती मला विरहाचे निखारे,
तुझ्या आसवांनी विझवू नको रे....

संपले इथे हे जरी श्वास माझे,
तुझा तू स्वतःला दोष देवू नको रे...

कैफियत......

अस्तित्व माझे का नाकारले तू,
प्रेमास माझ्या का धिक्कारले तू....

फुलांनी असे कसे वार केले,
तरी पाकळ्यांना कुरवाळले तू....

मी फक्त केली चांदण्याची अपेक्षा,
रात्रीस मग का सांग रोखले तू.....

बरसून पावसाने उन्माद केला,
तरीही ढगांना बोलावले तू.....

नसलो जरी जगती आता मी,
तरीही मजला का खुणावले तू.....

Monday, January 27, 2014

वादळ......

इथे सागराचे थैमान चाले,
किनारे कसे बेईमान झाले....

दिली सावली ज्या या तरुनी,
प्रलयात सारे उध्वस्त झाले......

उसळून लाटा गगन चुम्बणाऱ्या
दयेच्या हातांचे प्रहार झाले..........

नुकतीच फुटली, पालवी कोवळी ती,
फुलांचे सडे कसे निष्प्राण झाले.....

न्हाऊन अंगणाने शृंगार केला,
मुखडे घरांचे विद्रूप झाले......

आधार होता, तू ज्या पामरांचा,
अस्तित्व त्यांचे तडीपार झाले...

आक्रोश सारा भरुनी आसमंत,
लाटात अश्रू पोरके जहाले......


 

 

तक्रार....

कविता लिहायला, नेहमीच मला सांगत असतेस,
माझे सारे शब्द मात्र, तुझ्याकडेच ठेवत असतेस....

कसा लिहू मी कविता, तुझ्याकडील शब्दाविना,
चेहऱ्यावरील स्मिताआड, सारेकाही लपवित असतेस....

तुझ्या बोलण्यापेक्षा, ती नजरच सारं सांगून जाते,
प्रश्नाशिवाय उत्तराची, नेहमी अपेक्षा करीत असतेस...

तुझ्या शिवाय आयुष्य, म्हणजे एक अनंत पोकळी,
तुझ्यावाचून जगण्याचं, सतत कोडं घालत असतेस...

ओठातले शब्द सारे, ओठ आडच कुढत राहतात,
माझे अश्रू पुसण्याचा, देखावा मात्र करत असतेस......

जिद्द......

किती सोसायच्या वेदना या जीवाने,
फसवून जावे का तू चोरपावलाने.....

भृंगासवे लुटुनी आस्वाद चुंबनाचा,
बंदी करावे त्यास मिटून पाकळीने.....

शब्दासवे खेळण्याचा छंद माझा,
मैफिलीस का त्या टाळावे स्वराने...

किरणे उमलता ती फुले शुभ्र जाई,
कोवळे अंकुर का जाळावे उन्हाने....

हरलो किती, तरी होईल जीत माझी,
तोडून बंध जसे झेपावे पाखराने.....

Monday, January 20, 2014

माणसास....

अरे माणसा माणसा, जग तसेच राहूदे,
पाणी नको रे अडवू, त्याला तसेच वाहुदे...

पाणी अडले भिंतीत, खाली गावे तहानली,
गुदमरे जीव माझा, साठलेल्या पाण्याखाली....

तुझी हाव न शमली, किती झाडे तू तोडली,
झाली जंगले उजाड, वाट पावसाची अडली...

तूच एकला का इथे? कितीतरी येथे जीव,
सारे जगती सुखाने, तुझी संपे न का हाव?

वीतभर जीभे साठी, मारी जीव का निष्पाप,
घडे भरशी पापाचे, याला नाही रे उःशाप......

फुले तोडीशी अपार, सजवण्या तुझे घर,
बाह्य सजणे कशाला? ठेव मन तू सुंदर...

फुल नाहीरे फुलत, दावण्यास त्याचे रूप,
त्याचा धर्मच फुलणे, गंध उधळे अमोप....

झाली जंगले उजाड, आता पाऊस पडेना,
कळे सारे रे तुजला, समजून उमजेना...

तू नाहीरे निर्मिला, या जगाचा पसारा,
नाही तुला अधिकार, बदलण्या तो चेहरा.....

हाच निसर्ग साऱ्यांना, घेई पदराच्या खाली,
दुखावले जरी त्याला, तो न तोडतो सावली....

देणे निसर्गाचे तुला, सदा मिळत राहते,
केली काही जरी चूक, माया अखंड वाहते....

राहा आनंदाने तू, कमी तुला न कशाची,
झोळी राही भरलेली, चिंता कर न उद्याची....

जन्म एकच मिळे, त्याचे सार्थक होवू दे,
जगण्यास इतरांना, तुझा आधार होवू दे...

Thursday, January 16, 2014

सामान्य......

दिवस फक्त वेगळा असतो,
वर्ष सुद्धा वेगळ असतं,
जगण्यासाठी लढणार्याला,
त्यात काही वेगळं नसतं......

रोजचीच ती धावपळ,
सकाळी लवकर उठायचं,
जगण्यासाठी सगळा दिवस,
मर मर मरायचं......

तेच तेच रस्ते असतात,
तेच तेच चेहरे,
कुठून भरायचे रोज वेगळे,
स्वप्नात रंग गहिरे ?

प्रत्येक चौकात लाचार पोरं,
भिक मागत उभी असतात,
एक रुपया द्यायलापण,
मोठे हात मागे फिरतात......

घरी आल्यावर पोरं,,
खाऊसाठी हात पसरतात,
वैतागलेले आईबाप,
पोरांवरच बरसतात...

पोरांना कशी कळावी,
आई-बापाची धडपड,
निष्पाप कोवळे जीव ते,
त्यांचीच खरी होते परवड....

आई बाप भेटत नाहीत,
कोणाचाही आधार नसतो,
डोळ्यातलं पाणी पुसायला,
आईचा पदर नसतो.....

कितीही कमावलं तरी,
झोळीत काही साठत नाही,
रोजचं पोट भरता भरता,
शिल्लक काही पडत नाही...

जगात सुद्धा पैशाशिवाय,
काहीही मिळत नाही,
माणुसकी तर गायबच झालीय,
पण माणूस सुद्धा मिळत नाही....

जगणं इतकं कोरडं झालंय,
स्वप्नं सुद्धा पडत नाहीत,
खुरटलेलं रोपट,
काही केल्या वाढत नाही...

शेवटी स्वप्न हे स्वप्नच असतं,
वास्तव खूप वेगळं,
रोजच्या दोन घासासाठी,
सोसायचं हे सगळं......

Wednesday, January 15, 2014

निधर्मी भारत.....

"निधर्मी" जातीयवादाच सगळीकडे पेव फुटलं आहे,
राष्ट्रीय एकात्मतेला, या नेत्यांनीच पुरतं लुटलं आहे.......

जन्माला येण्यापुर्वीच, माणसाची जात जन्म घेते,
प्रत्येक पिढीचं भविष्य, जातीमध्येच गुंतलं आहे........

जन्मताना माणूस असतो, कुठलीच नसते जातपात,
तरीही आयुष्याचा चाक, जातीय दलदलित रुतलं आहे....

भडकविणारे नेतेच, निधर्मीपणाचा आव आणतात,
जातीपातीच्या सुत्रानीच मतांचं गणित सुटलं आहे......

माणसाचा धर्म कर्मावर ठरतो, कुठेही जन्माला तरी,
समजतं पण उमजत नाही, रक्तात तेच भिनलं आहे....

कोसळणाऱ्या पावसाला, कधीच रोखता येत नाही,
पण मुक्त वाहणारं पाणी, राखीव जागात अडलं आहे....

कधीतरी लोंढा यावा, फुटून जावीत जातीची धरणे,
तेंव्हाच कळेल साऱ्यांना, विकासाचं गणित सुटलं आहे......

Monday, January 13, 2014

निरोप......

मी आज येथ काही, न मागावयासी आलो,
उरले जे कर्ज थोडे, ते फेडावयासी आलो.......

घेतले क्षण उधार मी, जीवनातूनी तुझीया,
ते माझे कधी न झाले, सांगावयासी आलो.....

सजवून विश्व माझे, निष्पर्ण सावल्यांनी,
उरलेली पाने थोडी, तुज द्यावयासी आलो....

जाळून आज गेले, क्षण विरहाचे मला,
उरले जरा निखारे, ते फुलावावयासी आलो....

वेगळ्या आज झाल्या, वाटा तुझ्या नि माझ्या,
निरोप दुरावण्याचा, मी घ्यावयासी आलो.....

विडंबन...

( कवीवर्य आरती प्रभूंची माफी मागून....... )


गेले द्यायचे राहून, तुझे आश्वासनांचे देणे,
माझ्या पास उरले आता दोन - तीन महिने.....

झालो कसा पंतप्रधान मी सलग दुसऱ्यांदा,
मी केवळ कठपुतली, गळ्यात माझ्या फंदा....

कोळश्याचे नाव नको, इतरांनी केले चाळे,
हातहीना लावता, झाले तोंड माझे काळे......

" टू जी " म्हणजे मला, राहुल सोनिया ठावूक,
लुटीत सारे होते, पण पाठीवर मम चाबूक......

असतील झाले घोटाळे शेकडो दहा वर्षात,
मी एकाला न दोषी, सारेच सामील यात.......

केला माझा दगड, युवराजांनी फक्त चढण्या,
घातल्या जरी लाथा तरी, मुकाट साहतो वेदना.....

ऐंशी वय पार झाले, मी तरी काय करू?
बोलण्याचा त्रास होतो, भाषण कसे करू ?

म्हणती मला मौनीबाबा, चूक माझी कोणती?
तोंडास घातले टाके, तशी पक्षाची रीत होती.....

निवृत्ती पूर्वीच कशी विस्कटली ती चार घरे?
केली पापे कुणी? पण माझ्यावरच ताशेरे.....

आता न मी येणार येथे, साजरे दुरुनी डोंगर,
भले मग पक्षावर फिरो, दो गाढवांचा नांगर....

Sunday, January 12, 2014

रात्र.....

करुनी तिची प्रतीक्षा, रवि क्षितीजपार गेला,
रात्रीस पोचण्याला थोडा उशीर झाला....

वाटेत भेटली ती, निष्पाप सांजवेळ,
समजवण्यास तिजला, किंचित वेळ गेला.......

पांघरून सारे रंगीबिरंगी शेले,
क्षितीजाने चांदण्यांचा, दीपोत्सव केला....

धरती दमून गेली, सूर्यास साथ देता,
चंद्रास रात्र विनवी येण्यास संगतीला....

निःशब्द विश्व सारे, चाहूल ना कशाची,
त्या एकटेपणाचा रात्रीस भार झाला......

वेडी म्हणे स्वःताशी सूर्यास बोलवू का?
पूर्वेकडून तेंव्हा, उदयास सुर्य आला....

वाट माझी.....

आयुष्याच्या वैराण किनाऱ्यावर,
एकटाच उभा मी,
वादळांना तोंड देत.....
एक अनामिक वेदना अंतरात सलतीय,
अंधारापेक्षाही गडद, खोल खोल,
कोणाकडे व्यक्त करू?
कोणालाच जाणीव नाही वेदनेची,
कि फक्त मलाच होतात वेदना?
या निष्ठुर जगात,
आगीचे लोळ पचवत,
उभा आहे मी चेहरा हसरा करून,
कधीतरी कोणाशीतरी बोलू म्हणत,
शब्दही आता मुके झालेत.......
माळ गुंफायाच्या आधीच,
कोमेजलीत फुले,
आणि धागाही कमजोर झालाय.......
तुझ्या पूजेच्या तबकात,
जळतायत माझ्या आकांक्षा,
त्या निरांजनाच्या वातीबरोबर......
चालता चालता सांज झाली,
अंध्राची चाहूल लागलीय,
रस्ता मात्र अजूनही संपला नाही.......

Friday, January 10, 2014

वेदना.....

मोजीतो पाऊले मी, अंतराची राहिलेल्या,
उरल्या झोळीत थोड्या, आठवणी वाळलेल्या...

आयुष्य लाभले जसे, जगत राहिलो तसा,
ना कधीही खंत केली, क्षणांची न लाभलेल्या....

चांदण्या रात्रीतले, अंधार ही मी पहिले,
चंद्रास ना सवाल केले, क्षितिजावर थांबलेल्या.....

वादळे घोंगावाली, अन झुंजलो लाटा सवे,
उठून मी जावे कसे, मैफिलीतून रंगलेल्या.....

वार शब्दांचे तुझ्या, झेलले हृदयावरी,
दाविल्या ना वेदना, पापण्या जरी ओलावल्या....

का प्रेमाचे असे, तू, आज हिशोब मागीशी,
तूच लुटल्या होत्यास ना, जाणिवा हृदयातल्या.....

Thursday, January 9, 2014

पुन्हा पुन्हा.......

मी एकटाच येथे, उरतो पुन्हा पुन्हा,
जिंकून डाव सारे, हरतो पुन्हा पुन्हा...

विझवून चांदण्यांना आकाश रिक्त केले,
पण एक शुभ्र रेषा, दिसते पुन्हा पुन्हा......

वारा शिडात होता, नौका बुलंद होती,
पण एक लाट मागे, ओढी पुन्हा पुन्हा......

गोंगाट भोवताली, आक्रोश वंचितांचे,
आवाज सांत्वनाचे, छळती पुन्हा पुन्हा....

सोडून येथ सारे, वाटे लयास जावे,
पचवून विष सारे, जगतो पुन्हा पुन्हा....

गंतव्य.......

आयुष्य सरून गेले, अजुनी उमजले नाही,
आहे खरा कसा मी, अजुनी समजले नाही.......

रात्रीस स्पर्श होता, रवि लाजून लाल होतो,
नाते परस्परांचे, अजुनी समजले नाही.....

प्राशून सागराचे जल होतात मेघ तृप्त,
का ओतती पुन्हा ते, अजुनी समजले नाही.....

वाऱ्यास वाहताना येतो सुरेख गंध,
तो पुष्पास चुम्बताना, कोणीच पाहिले नाही....

धरती न सागराचे नाते असे निराळे,
पण कोरडा किनारा, पाऊल भिजवले नाही.....

ही एक वाट माझी आयुष्य चालण्याची,
जाणार मी कुठे ते अजुनी ठरवले नाही....

Monday, January 6, 2014

बोल....

जाहले बोलणे किती, पण संवाद कोठे जाहला?
घेतले चांदणे उशाला, पण चंद्र कोठे पाहीला?

वाहतो मदमस्त वारा मोगऱ्याच्या फुलातूनी,
नुसत्याच पण त्या येरझाऱ्या, गंध कोठे राहिला?

एक रस्ता नागमोडी, घेवूनी मृद्गालीचे,
पाउलांची खूण नाही, उसासतो तो एकला....

आठवांचे घेऊन ओझे, शोधितो मार्ग पुढला,
जाळ्यात दश दिशांच्या, पाय माझा गुंतला....

तू स्वतः हरवून गेली, शाश्वताच्या पलीकडे,
प्रतारणा ही तूच केली, बोल मजला लाविला...

Sunday, January 5, 2014

शोध....

चेहरे नुसतेच येथे, रंग साऱ्यांचा निराळा,

पालथे जग घातले, माणूस ना कोठे मिळाला....

वार तो वार होता, छोटा मोठा असे कसाही,
वेदना तितुक्याच झाल्या, भेगाळलेल्या मनाला....

मस्तीत मशगुल सारे, पेटलेली येथे चिता,
कोरड्या भावनेचा, एकही ना अश्रू गळाला.....

वार करुनी पाठीवरी, ते कधी ना आले पुढे,
भ्याड सारे शूर झाले, संघर्ष ना कधी कळाला.....

भाजलेले पाय माझे, श्रावणाच्या या सरीत,
सह्य होता जरा उन्हाळा, तो हि ना मिळाला....

आरश्यात पाहताना , प्रतिबिंब ही दुसरे दिसे,
मी ना मजला मिळालो, शोधूनी साऱ्या तळाला....

Saturday, January 4, 2014

Nostalgia……………

आठवतंय मला,
छोटा होतो जेंव्हा मी,
जग खूपच मोठं होतं....
तो शाळेचा रस्ता,
कोपऱ्यावरच सायकलच दुकान,
तो बर्फाचे गोळे विकणारा काका,
आणि फुले गजरे विकणारा छोटा मामू,
आता तेथे मोबाईलच दुकान आहे,
आणि व्हीडीओगेमचं पार्लर..
गर्दी असते तेथे खूप,
पण तरीही सारं कसं रिकामं रिकामं वाटतंय.....
बहुतेक माणूस आता छोटा होत चाललाय...

आठवतंय मला,
छोटा होतो जेंव्हा मी,
संध्याकाळ खूप मोठी असायची....
तास न तास ते पतंग उडवणं,
आणि बेभान सायकलींच्या शर्यती,
आणि मग दमून भागून घरी येणं....
आजकाल संध्याकाळच होत नाही,
दिवस संपतो न संपतो तोच रात्र...
वेळ पण बहुधा छोटा होत चाललाय...

आठवतंय मला,
छोटा होतो जेंव्हा मी,
मैत्री खूप गाढ असायची....
ते मित्रांच्या घरी जाणं,
त्यांना घरी बोलावणं,
कोणाकडेही खाणं,
तिथेच मनसोक्त खेळणं,
अगदी रडणं हि एकत्र,
आताही मित्र आहेतच,
पण मैत्री हरवून गेलीय,
कधीतरी कोणी रस्त्यात दिसलाच,
तर फक्त हाय......
आणि लगेच वाट वेगळी होते......
कोणत्याही शुभेच्छे साठी एक कोरडा SMS,
निर्विकार, भावनाहीन, केवळ कर्तव्यपूर्तीचा...
आजकाल नातीही बदलत चालली आहेत....

आठवतंय मला,
छोटा होतो जेंव्हा मी,
खेळ पण किती मस्त असायचे,
विटी दांडू, लपंडाव,
पळापळी, आट्यापाट्या....
आता घरी इंटरनेट आहे, टीव्ही आहे,
वेळच शिल्लक राहत नाही...
आजकाल आयुष्य पण बदलत चाललंय...

आयुष्याचं गाणं फारच छोटं असतं रे...
"उद्या" कोणीच पाहिलेला नसतो....
हा येणारा " उद्या " फक्त स्वप्न आहे,
हाच क्षण आहे खरा जगण्याचा ... ,...
या हव्यासाच्या जगात,
आपण फक्त पळतोय वेड्यासारखे....

मित्रा,
हे आयुष्य पुन्हा नाही मिळणार...
जगायचं तर आत्ताच जागून घे,
नाहीतर,
स्मशानाच्या फाटकावरील पाटी प्रमाणे होईल,
" शेवटी इथेच यायचं होतं,
पण येता येता सारं आयुष्य संपून गेलं...... "

Wednesday, January 1, 2014

व्यथा....

दंगे धोपे,

मोर्चे, बंद....
इकडं भ्रष्टाचार, तिकडे आग,
लाचार वृध्दत्व,
जागोजागी उसवलेलं,
सामान्य माणसाचा भविष्य,
त्रिशंकू सारखं,
नेत्यांची गुंडगिरी,
सत्तेची हाव,
जमेल तिथे हात मारून,
धनान भरली बाव,
सत्तेची अमर्याद धुंदी,
सर्वाना नाचवतेय,
महागाईचं विष,
जनता पचवतेय.....
नाही होत सहन हे सारं.....
न दिसणाऱ्या जखमेतून
भळाभळा रक्त वाहतंय,
चेहऱ्यावर नकली हसू
जगण्यासाठी ठेवायचं,
षंढ नेतृत्व,
धडपडतंय स्वतःची अब्रू झाकायला
फाटक चरित्र घेवून,....
डोक्यावर घेतलंकी,
पाय उघडे पडतात,
पाय झाकावे तर,
खोटा मुखवटा दिसतोय,
कोणालाच फिकीर नाही,
जगण्यासाठी मरणाऱ्या,
सामान्य जीवाची,
दिवसाढवळ्या सर्वासमक्ष,
बलात्कार होतोय देशावर,
त्याला सांभाळणाऱ्या नेत्याकडूनच,
कोठे तक्रार करणार?
कुंपणच शेत खातंय,
करोडो हात आहेत इथे,
पण अजूनही ते उठत नाहीत
दोन हात करायला,
जणू कोणी ते छाटून टाकलेत...
कोणताच उरलेली नाही,
अन्याया विरुद्ध आग,
पेटण्या आधीच ती विझून जातेय.....
पण कोठे तरी एक ठिणगी,
अजूनही शिल्लक आहे,
जमेल तितकं पेटवण्याची,
अजूनही साहस करतेय
हे सारं संपविण्यासाठी,
एकत्र आणायला हव्यात या ठिणग्या....
ती पहा परत एकदा,
दारावर टकटक होतेय,
उभे आहेत दरवाज्यात तुमच्या,
ते पवित्र आत्मे,
ज्यांनी या देशाला मुक्त केलं,
पारतंत्र्याच्या जोखडातून,
आज पुन्हा ते भीक मागताहेत,
स्वतंत्र भारताच्या स्वातंत्र्याची,
कारण आज आपलं स्वातंत्र्य,
नेत्यांनी काबीज केलंय,
झालीय आपली कठपुतळी,
दोऱ्या ओढल्या कि नाचणारी,
खेळसंपे पर्यंत आपलं अस्तित्व,
खेळ संपल्यानंतर पुन्हा जाणार,
त्या जनता नावाच्या अडगळीत,
मग पुढे पाच वर्ष,
कितीही रडा, कितीही टाहो फोडा,
नाहीत पोचणार आपले आवाज,
पुढचा खेळ येई पर्यंत...
कुठे थांबणार हे?
कोण थांबवणार?
कोण?