Friday, April 18, 2014

भार.....

बांधू इथेच घरटे, आता पुन्हा नव्याने,
हरणार ना कधीही, वादळाच्या भयाने..........

लुटते कधी न वेल, उमलणाऱ्या कळीला,
पण बाजार या फुलांचा, भरवला माणसाने.....

डोळ्यास पापण्यांची, अवलोकानास बंदी,
नजरेविनाही दिसती, सारे मला उखाणे......

ताटात सर्व दिसते, वाढून ठेवलेले,
भवति खडे पहारे, अन दानाचे बहाणे...

वादळे घोंगावली, करुनी उजाड वस्ती,
फिरुनी सर्व येथे, वसली घरे नव्याने......

तू उगाच आता, टाकू नको उसासे,
माझाच भार आहे, वाहीन मी सुखाने....

Monday, April 14, 2014

आयुष्य.....

वेदना झाल्याविना मज, नशा न येते यशाची,
झुंजणे माहित आहे, तमा नसे पराभवाची......

मी कधी ना दीन होतो, डोळ्यात ना ती आर्जवे,
उगवणारा सुर्य देतो, उर्जा मला झुंजण्याची ....

नाही कोणास पुसले, रस्ता मला नेईल कोठे?
शोधिली माझीच मी, वाट माझ्या जीवनाची.....

जन्मती मेघ सारे, गर्भी तापत्या उन्हाच्या,
बरसुनी लयास जाती, अपेक्षां ना त्या कशाची.......

हारजीतीच्या येरझाऱ्या, जगणे असेच असते,
रात्र जाता दिवस येतो, चुकते ना वेळ त्याची.... ...
 

Tuesday, April 1, 2014

धावा.......

अजुनी कसा रे शांत, विठ्ठला तू विटेवरती,
पाहुनी ये जरासे, जे घडते तुझ्या सभोती......

उरली न भक्ती कुठे, नुसतेच कर्मकांड,
पिल्लास भूक जाळी, हवानात तूप रोटी....

चोरास येथ आता, साव म्हणावे लागते,
दैत्या समोर कशी  रंगते शुभंकरोती....

पाऊस सर्व जखमा, उघड्या करून जातो,
उरते हातात झोळी, हुंदके फिरून ओठी...

राखून ठेवलेले, त्याचे न काही मोल,
लाजेसहीना पुरते, उरली चिंधी चपाटी.......

मरणेही आज येथे, झाले महाग देवा,
थैली विना कुठेही, मिळते न मूठमाती....