Saturday, July 30, 2011

सुकलेल्या त्या फुलात....

सुकलेल्या त्या फुलात अजुनी गंध ओले होते,
मिटलेल्या पापण्यात अजुनी रंग ओले होते....
शरमून चांदण्यांना तो चंद्र ढगा आड गेला,
काजव्यांनी उन्मादुन दीपोत्सव केले होते.....
ओढ्यात फेसाळत सारे पाणी पिसाट वाहे,
सागराचे जणू येथे अस्तित्व लोपले होते.....
रस्त्यात माणसांचा पूर वाहुनी आला,
शोधून माणसाला सारे डोळे थकले होते.....
घावात अजुनी माझ्या गंध फुलांचे येती....
त्या सुरीनेही जणू तुझे गुलाब चुंबिले होते...

Thursday, July 28, 2011

नाव यादीत नाही....

आता मी तुझ्या त्या हुंदक्यात नाही,
नजरेत नव्हतो, अन आसवांत नाही........
विझवून चांदण्यांना आकाश रिक्त केले,
पण मी काजव्यांच्या गुलामीत नाही......
आभास तो क्षणाचा, कोठून सूर आले,
पण नाव माझे तसे तुझ्या ओठात नाही.....
क्षण आज सर्व व्याले, घटना किती दिसाव्या,
प्रतिबिंब चेहऱ्यांचे पण आरश्यात नाही.....
येथून आज माझे होते प्रयाण ठरले,
जाणार पण कसा? माझे नाव यादीत नाही....

Tuesday, July 26, 2011

आठवणी...

श्रावणातल्या रिमझिम धारा अवचित उतरून आल्या,
मनातल्या तुझ्या आठवणी मग ओसंडून वाहिल्या....

अशाच एका धुंद धुंद अन ओल्या सायंकाळी,
प्रीतीची प्रतिमा उतरली निर्मळ निर्झर जळी,
थेंब थेंब पानात उतरले झाल्या चिंब भावना ओल्या....

धरतीच्या अंकावर पहुडले उन कोवळे सोनेरी,
इंद्रधनूची पहात अवखळ गगनी उंच भरारी,
गंधास ओल्या आलिंगन देता थरथरल्या पाकळ्या.....

गेले बरसून श्रावण किती, मी अजुनी व्याकूळलेली,
हृदयाच्या अंतरी लपविली, सारी दुःखे साकळलेली,
सुगंध तो उरला न आता या जीवात सुकलेल्या..

Saturday, July 9, 2011

थोडे तसे राहून गेले....

ओळखीच्या त्या स्वरांनी मी तूला बोलाविले,
सांगायचे सर्व होते, पण काही तरी राहून गेले......
वादळी वाऱ्यात नौका, नजरेत ना कोठे किनारा,
फाटलेल्या शीडांचे, आधार मी तोलून नेले.....
जाहल्या जखमा उरी, भरुनी त्या गेल्या जरी,
साचलेल्या वेदनांनी, आयुष्य पण रंगून गेले.......
पावसाच्या थेंबात कवळ्या, बहरला पारिजात,
त्याच थेंबाच्या कराने , फुल ते वाहून नेले.......
आज मी साऱ्या क्षणांना, विसरुनी गेलो जरी,
त्या तुझ्या श्वासात माझे, श्वास का गुंतून गेले.....
तू दिलेल्या क्षणांचे कर्ज माझ्या डोईवरी,
फेडायचे सर्व होते, थोडे तसे राहून गेले....

Thursday, July 7, 2011

प्राक्तन........

आयुष्य माझे सारे मरणाला तारण होते,
जगण्यासाठी माझ्या ते एकच कारण होते.....

आभाळ कुंद सारे, सर कुठे न पावसाची,
डोळ्यात बरसणारे, अगतिक श्रावण होते...

कोठून आज आलो, कोटे असा निघालो,
वाटेत जाळणारे, आठवांचे शिंपण होते....

निःशब्द आज सारे, चाहूल न कुणाची,
गाण्यास गीत माझे, शपथेचे बंधन होते.....

राहू कसा उभा मी, सरणा मधून आता,
फसवून वेळ गेली, ते माझे प्राक्तन होते....

Friday, July 1, 2011

काही क्षण ठेवून जा.........

माझे हरलेले डाव आता तू मनावर घेवू नको,
कोसळलेला असलो तरी, त्या क्षणावर जावू नको...
कळून चुकलंय आता, आपले मार्ग वेगळे आहेत,
काटेरी आयुष्यात माझ्या तू आता हरवू नको...
फाटलेल्या शीडानंच माझी नौका सजली आहे,
पाठीशी वारा आहे, आता तू दिशा ठरवू नको...
तुझ्या सहवासाची धूळ, आयुष्यावर साचली आहे,
झाकोळलेल्या इंद्रधनुला, तुझा रंग देवू नको,,,,,
इथलं सारं तुझंच होतं, मी कफल्लक आहे,
काही क्षण ठेवून जा, सगळेच घेवून जावू नको...