Friday, February 18, 2011

कारण शेवटी बाकी शून्य उरते....

कधीतरी आयुष्यात असं काही घडतं
सावरायालाही वेळ मिळत नाही,
प्रलयाची लाट रोंरावत येते,
आयुष्यभर जपलेलं, काहीच उरत नाही.....

कुणीतरी आपला जीवाचं माणूस असतं
दुसरंच कोणी तरी त्याला ओढू पाहत,
काळजाच्या कप्प्यात जीवापाड जपलेलं
बळेच त्याला बाहेर काढू पाहत....

ती काळजाची वीण तुटताना
जीवाला ज्या यातना होतात,
तोडणाऱ्याला काहींच देणं घेणं नसतं,
त्या दोन जीवांचे मात्र हाल होतात....

सगळं कसं निमुटपणे सोसायचं
आपल्याला कोणताच आधार नसतो,
आपली तशी वृत्तीच नसते
आपल्याकडे भावनेचा व्यापार नसतो...

आयुष्याच्या जमापुंजीतून सारखी
अशी वजाबाकी होतंच राहते,
मात्र हिशोब कधीच मांडायचा नाही
कारण शेवटी बाकी शून्य उरते....

Thursday, February 17, 2011

कधी कधी असं होतं.......

कधी कधी असं होतं, काहीच कळत नाही,
वणव्यात उडी मारून देखील, शल्य काही जळत नाही.....

बेधुंद पावसाच्या सारी अंगावर धावून येतात,
भावनांना पूर येतो, मात्र मन काही भरत नाही.... .

दूरच्या जळणाऱ्या दिव्यांनी, रात्रीची जाणीव होते,
तुझ्या भेटीची सांज मात्र, मनातून सरत नाही...

कित्येकदा वाटते, त्या अंधारात झोकून द्यावे,
तुझा आठव आलाकी मात्र, पाय तिकडे वळत नाही...

का अशा बंधनात, तू मला अडकून ठेवलेस?
समोरच मृत्यू दिसतोय, पण जगणे मात्र संपत नाही....

Tuesday, February 15, 2011

मी आता नसणार आहे...

जाणले होते मी, हे असेच होणार आहे,
मृत्युनंतरही मी एकटा असणार आहे...

विस्कटले हृदय, मी एकला आक्रन्द्लो,
कोणास माझ्या वेदनेची, जाणीव ती असणार आहे?

दुःख ते वाहून गेले, जखमा ओल्याच राहिल्या,
तिरस्काराने तुझ्या मी घाव ते भरणार आहे..

भासले कोणीतरी, चाहूल मजला लागली,
वेळ पण निघून गेली, मी आता नसणार आहे...

तिमिरात चांदण्यांची.....

तिमिरात चांदण्यांची ओंजळ नभी सांडली,
प्रिया आज थोडी भेट आहे लांबली.

मौनातले तुझ्या मी अर्थ सारे जाणले,
हृदयातील तव मी हाक आहे ऐकिली.

वाटे तुझ्यामध्ये मी असे एकरूप व्हावे,
देह दोन तरी, एक व्हावी सावली.

माझ्याच या सुखाचा मज वाटतो रे हेवा,
मैफिल जीवनाची तालासुरात रंगली.