Wednesday, February 3, 2016

राग मधुसूरज ( पं.  कुमार गंधर्व)

अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च |
अजापुत्रं बलिं दद्याद्देवो दुर्बलघातक: ||

हे सुभाषित आठवलं की आठवण येते ती पं. कुमार गंधर्वांच्या राग मधुसूरजची. अप्रचलीत राग ही त्यांची खासियत. या रागाची मला ओळख करून दिली माझे एक वरिष्ठ स्व. श्रीकांत देशपांडे यांनी.
या सुभाषिताचा अर्थ स्पष्ट आहे. देवीला किंवा देवाला वाघ किंवा हत्तीचा बळी दिला जात नाही. कारण दोन्ही पशू प्रचंड ताकदवान. मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर कितीही प्रगति केली तरी आपले अधिपत्य तो दुर्बलांवरच चालवतो. म्हणून मग बळी चढडविण्यासाठी त्याने निवड केली अशाच एका दुर्बल प्राण्याची,  आणि तो प्राणी म्हणजे बकरी किंवा कोकरू. या सुभाषितात हेच सांगितले आहे. की प्रत्यक्ष देव सुद्धा त्यांचे रक्षण करत नाही.
तर मला त्यांनी प्रथम कोणतीही पार्श्वभूमि न सांगता हा राग ऐकवला. अर्थात त्यांचा हेतूही तोच होता. आणि मलाही या रागामागे कांही पार्श्वभूमि असेल याची कल्पना नव्हती. हा राग कुमारांच्या एका ध्वनिफितेवर आहे.  एका बाजूला मधुसूरज आणि दुसर्या बाजूला भावमत भैरव. प्रथम ऐकला तो निव्वळ स्वरांसाठी. कारण कुमार म्हणजे साक्षात सुरांचे विद्यापीठ. रागातील करूणता निश्चित जाणवली. एखादी ओली आणि खिन्न सायंकाळ आणि तशात लादलं गेलेलं एकटेपण… बाहेर जाव तर पाऊस आणि घरात खायला उठलेला एकाकीपणा… अशी कांहीशी हतबल मनस्थिति असावी तसा थोडं वाटत होतं. रागात तशी खूप मोठी आलापि किंवा जबड्या तानांचा वापर जास्त जाणवला नाही. पण तो स्वरातील दर्द मात्र अस्वस्थ करून गेला. राग संपल्यावर कांही क्षण सुन्न मात्र निश्चित झालो होतो.
थोडा वेळ गेल्यावर मला तंद्रीतून जागं करत म्हणाले,  आता तूला या रागाची पार्श्वभूमि सांगतो. आणि ती पार्श्वभूमि ऐकून मी प्रचंड अस्वस्थ झालो. म्हटलं,  मला आता पुन्हा तो राग ऐकायचा आहे. आणि दुसऱ्यांदा जेंव्हा ऐकला,  तेंव्हा नकळत डोळ्यातून घळाघळा पाणी आले.
या रागाचा विलंबित ख्याल एकतालात आहे आणि बोल आहेत “बचाले मेरी माँ “. एका छोट्या कोकराला सजवून धजवून देवीला बळी देण्यासाठी नेत असतात. देवीला बळी.  म्हणजे गुलाल माखून वाजत गाजत मिरवणुक चाललेली असते. जल्लोष चाललेला असतो. ढोल,  वाजंत्री, कोकराच्या गळ्यात हार…  सगळीकडे आनंद उत्साह ओसंडून वहात असतो. कोकराला मात्र जाणवलेलं असतं की आपलं आयुष्य आता कांही वेळाचच आहे. आणि या गर्दीतील कोणीही आपला जीव वाचवणार नाही. अशा असहाय्य अवस्थेत आपल्याला कोण वाचवू शकेल तर ती फक्त देवी,  जिला बळी चढविण्यासाठी आपल्याला नेत आहेत. आणि ते देवीची करूणा भाकायला लागते….. “बचाले मेरी माँ “..... हा विलंबित कुमारांनी असा काही रंगवलाय की बस…  डोळ्यासमोर तो प्रसंग साक्षात उभा रहातो. स्वरांस्वरातून मूर्तीमंत कारूण्य डोळ्यासमोर उभे रहाते. त्यातही कांही जागा इतक्या अप्रतिम की डोळ्यातून पाणी आलेच पाहिजे.
अशीच मिरवणुक पुढे जात असते आणि समोर देवीचे मंदिर येते. लोकांच्या जल्लोषाला सीमा रहात नाही. सारे एका वेगळ्याच धुंदीत… पण इकडे कोकरू अस्वस्थ…  बळी देण्याची वेळ आली तरी “माँ” नाही आली जीव वाचवायला… शेवटी आता कोकराला कळून चुकलं. माँ आता काही मला वाचवायला येणार नाही आणि आपलं मरण अटळ आहे. पण हो…  आपण तर आता मरणारच आहोत.  मग आता निदान या माणसांना तरी माझ्या मरणाचा आनंद उपभोगूदे…..
आणि मग इथे चालू होतो द्रुत…  “ढोलीया बजाले बजाले…. “ अरे ढोलकीवाल्या,  वाजव…  जोरात वाजव…  सर्वांना घेऊदे आनंद माझ्या मृत्यूचा…  अरे याच साठीतर सारे इथे जमले आहेत…. मी तर मरणारच आहे…  निदान मग यांना तरी बेहोशीत नाचू दे…  बजाले,  ढोलीया बजाले….