Monday, December 5, 2011

वेदना....

माझ्याकडून घेण्यात आता,
तुला काहीच स्वारस्य नाही,
मीही सारं तुलाच दिलंय,
माझ्याकडेही काहीच नाही..........
नव्या दिशा शोधताना तू,
जुन्या वाटा हरवून गेलास,
आकाशात भरारी घेताना,
दोरीचा आधार विसरून गेलास............
आता तुझं आकाश नव,
सवंगडीहि नवे नवे,
कधीतरी विचारायचं होतंस,
मला होते काय हवे.........
निर्जीव माझ्या डोळ्याची,
तूच तर दृष्टी होतास,
इवल्याश्या माझ्या जगात,
तूच सारी सृष्टी होतास........
कोणीतरी दुरावल्याचं दुःख,
तुला कसं समजणार?
पुढचं फक्त पाहणाऱ्या तुला,
मागच्याची फरफट कशी उमजणार?
खरंतर नातं असंच असतं,
मला कधी कळलंच नाही,
समोर खाई दिसली तरी,
पाऊल मागे वळलंच नाही.....
तुझ्या लेखी मी आता,
निरुपयोगी इतिहास आहे,
पण निखळलेल्या चीऱ्यात सुद्धा,
अजून एक श्वास आहे........
आयुष्याची ज्योत माझ्या,
तरीही तेवत असेल,
अंधारात तू अडखळशील तेंव्हा,
तिची तुला सोबत असेल.......

Thursday, August 25, 2011

वेडे मवाळ होते........

येथे पराभुतांचे वसले महाल होते,
सत्यास दाम्भिकानी केले सवाल होते.........
सोडून लाज सारी, मुजरा स्वतःस करती,
उपकार जोखाणारे, त्यांचे हमाल होते.........
सत्यास जागणारे झाले इथे करंटे,
मागून वार केले ते सारे खुशाल होते.......
सत्ता इथे कुणाची, मग्रूर कोण झाले?
हातात तस्करांच्या सारे निकाल होते.......
आवाज शांततेचा, उठला असा त्रिलोकी,
दंशात प्रेरणेचे असणे जहाल होते........
होवून एक क्रांती, उखडून राज्य सारे,
आकाश जाळणारे, ते वेडे मवाळ होते........

Saturday, August 20, 2011

माझ्या अंतरात........

माझ्या अंतरात,
तुझी ओवी,
नकळत मनाला,
गुंतवून ठेवी......
माझ्या घरात,
तुझी पायधूळ,
पावलं मोजायचं,
माझं खूळ.......
गूढ एकांत,
ठसला मनात,
जगणं राहिलं,
तुझ्या ऋणात.......
तुटून गेले,
सारे बंध,
परके झाले,
फुलांचे गंध..........
वाणीत नाही,
उरला प्राण,
सुटतात शब्दांचे,
बोथट बाण......
क्षितिजावरची,
निळी रेघ,
रुंदावत जाणारी,
मनाची भेग......
माळेतील मोती,
ओघळून जावा,
धरता धरता,
हरवून जावा.......
जगणं असं,
उपऱ्या सारखं,
घराच्या फुटलेल्या,
खापऱ्या सारखं.......
ओलांडून जाताना,
नसलेल्या रेषा,
हरवून गेल्या,
जगण्याच्या दिशा......

Monday, August 8, 2011

पाय रुतलेले....

भावना दाटलेल्या,
सूर गोठलेले,
अनामिक काहूर,
मनात उठलेले......
तुझ्या आठवणी,
पोटात साठवून,
क्षितिजावर आकाश,
खाली झुकलेले....
ओंजळीतले पाणी,
सांडू नये म्हणून,
माझे दोन्ही हात,
घट्ट मिटलेले.....
चेहऱ्यावर तुझ्या,
लाघवी हसू,
माझे सारे,
गुलाब सुकलेले...
शब्दांची रास,
पुढ्यात पडलेली,
हवे ते मात्र,
शब्द चुकलेले.....
तुझी ओळख,
डोळ्यात जागवत,
माझे दिवस,
इथेच थांबलेले...
तुझ्यासाठी वाहताना,
जगण्याचे ओझे,
पुढ्यात उरलेत सारे,
डाव हरलेले....
कधीतरी येथे,
परत येशील म्हणून,
जगण्यात माझे,
पाय रुतलेले....

Wednesday, August 3, 2011

अर्ज निरोपाचा...

शोधिले आयुष्य सारे तुझ्या प्रश्नाच्या उत्तराला,
सुटलेल्या प्रश्नातून मग एक नवा प्रश्न आला.......

पेटलेले शब्द तुझे,  आयुष्य सारे विझवून गेले,
बोटांनी निखारयांच्या मग आधार मजला दिला....

उधारीच्या वहीतला तो शेवटचाच रकाना,
कर्ज माझ्या आयुष्याचे मला जाणवून गेला....

आजही होते मला तुला काही सांगायचे,
प्रत्यंचेवर चढण्या आधी भात्यात शब्द गेला.....

हातात आपल्या होते ते अर्ज निरोपाचे,
सदिच्छा देण्यास सारा पूर माणसांचा आला....

Saturday, July 30, 2011

सुकलेल्या त्या फुलात....

सुकलेल्या त्या फुलात अजुनी गंध ओले होते,
मिटलेल्या पापण्यात अजुनी रंग ओले होते....
शरमून चांदण्यांना तो चंद्र ढगा आड गेला,
काजव्यांनी उन्मादुन दीपोत्सव केले होते.....
ओढ्यात फेसाळत सारे पाणी पिसाट वाहे,
सागराचे जणू येथे अस्तित्व लोपले होते.....
रस्त्यात माणसांचा पूर वाहुनी आला,
शोधून माणसाला सारे डोळे थकले होते.....
घावात अजुनी माझ्या गंध फुलांचे येती....
त्या सुरीनेही जणू तुझे गुलाब चुंबिले होते...

Thursday, July 28, 2011

नाव यादीत नाही....

आता मी तुझ्या त्या हुंदक्यात नाही,
नजरेत नव्हतो, अन आसवांत नाही........
विझवून चांदण्यांना आकाश रिक्त केले,
पण मी काजव्यांच्या गुलामीत नाही......
आभास तो क्षणाचा, कोठून सूर आले,
पण नाव माझे तसे तुझ्या ओठात नाही.....
क्षण आज सर्व व्याले, घटना किती दिसाव्या,
प्रतिबिंब चेहऱ्यांचे पण आरश्यात नाही.....
येथून आज माझे होते प्रयाण ठरले,
जाणार पण कसा? माझे नाव यादीत नाही....

Tuesday, July 26, 2011

आठवणी...

श्रावणातल्या रिमझिम धारा अवचित उतरून आल्या,
मनातल्या तुझ्या आठवणी मग ओसंडून वाहिल्या....

अशाच एका धुंद धुंद अन ओल्या सायंकाळी,
प्रीतीची प्रतिमा उतरली निर्मळ निर्झर जळी,
थेंब थेंब पानात उतरले झाल्या चिंब भावना ओल्या....

धरतीच्या अंकावर पहुडले उन कोवळे सोनेरी,
इंद्रधनूची पहात अवखळ गगनी उंच भरारी,
गंधास ओल्या आलिंगन देता थरथरल्या पाकळ्या.....

गेले बरसून श्रावण किती, मी अजुनी व्याकूळलेली,
हृदयाच्या अंतरी लपविली, सारी दुःखे साकळलेली,
सुगंध तो उरला न आता या जीवात सुकलेल्या..

Saturday, July 9, 2011

थोडे तसे राहून गेले....

ओळखीच्या त्या स्वरांनी मी तूला बोलाविले,
सांगायचे सर्व होते, पण काही तरी राहून गेले......
वादळी वाऱ्यात नौका, नजरेत ना कोठे किनारा,
फाटलेल्या शीडांचे, आधार मी तोलून नेले.....
जाहल्या जखमा उरी, भरुनी त्या गेल्या जरी,
साचलेल्या वेदनांनी, आयुष्य पण रंगून गेले.......
पावसाच्या थेंबात कवळ्या, बहरला पारिजात,
त्याच थेंबाच्या कराने , फुल ते वाहून नेले.......
आज मी साऱ्या क्षणांना, विसरुनी गेलो जरी,
त्या तुझ्या श्वासात माझे, श्वास का गुंतून गेले.....
तू दिलेल्या क्षणांचे कर्ज माझ्या डोईवरी,
फेडायचे सर्व होते, थोडे तसे राहून गेले....

Thursday, July 7, 2011

प्राक्तन........

आयुष्य माझे सारे मरणाला तारण होते,
जगण्यासाठी माझ्या ते एकच कारण होते.....

आभाळ कुंद सारे, सर कुठे न पावसाची,
डोळ्यात बरसणारे, अगतिक श्रावण होते...

कोठून आज आलो, कोटे असा निघालो,
वाटेत जाळणारे, आठवांचे शिंपण होते....

निःशब्द आज सारे, चाहूल न कुणाची,
गाण्यास गीत माझे, शपथेचे बंधन होते.....

राहू कसा उभा मी, सरणा मधून आता,
फसवून वेळ गेली, ते माझे प्राक्तन होते....

Friday, July 1, 2011

काही क्षण ठेवून जा.........

माझे हरलेले डाव आता तू मनावर घेवू नको,
कोसळलेला असलो तरी, त्या क्षणावर जावू नको...
कळून चुकलंय आता, आपले मार्ग वेगळे आहेत,
काटेरी आयुष्यात माझ्या तू आता हरवू नको...
फाटलेल्या शीडानंच माझी नौका सजली आहे,
पाठीशी वारा आहे, आता तू दिशा ठरवू नको...
तुझ्या सहवासाची धूळ, आयुष्यावर साचली आहे,
झाकोळलेल्या इंद्रधनुला, तुझा रंग देवू नको,,,,,
इथलं सारं तुझंच होतं, मी कफल्लक आहे,
काही क्षण ठेवून जा, सगळेच घेवून जावू नको...

Tuesday, June 28, 2011

ओळख....

सूर्याच्या किरणानाही अंधाराची ओढ असते,
छोट्याश्या झरोक्यातून, ते घरामध्ये लपून बसते.....
इवल्या इवल्या वेली सुद्धा वृक्षाचा आधार होतात,
प्रत्येकाला कुठल्यातरी सहाऱ्याची गरज असते....
अवखळ ओढे नदीला भेटले कि शांत होतात,
दोघामध्ये जणू आई-मुलाचे नाते असते....
आयुष्याच्या प्रवासात, कित्येक मित्र येवून जातात,
त्यांनी जपलेली आठवण, हीच आपली ओळख असते....

Monday, June 27, 2011

खेद....

तुझ्या आठवणीत, सारी रात्र जागत होती,
फिटलेले कर्ज, पुन्हा पुन्हा मागत होती......
विझलेला चेहरा, माझ्या मनातीलच होता,
वाटणारी भीती पण, अनाकलनीय होती....
लाटेने उध्वस्त केलेले आयुष्य वेचताना,
काळाची सगळी, गणितेच चुकत होती....
कापलेले पंख घेवून उंच उडणारी पाखरे,
झाडावरती यायला केविलवाणी होत होती.....
भर पावसात तिकडे वणवा कहर करतोय,
ढगांची झुंड येथे, पाणी मागत फिरत होती...
अस्तित्वाच्या साऱ्या खुणा कधीच पुसून गेल्या,
आठवणही भूतकाळात, स्वतःला शोधत होती.....
मंदिरात गेलो, पण देवाकडे काय मागू?
पापपुण्याची रास तेथे अडगळीत रडत होती....

वाटते मजला......

वाटते मजला सखे मी अंबारीचा मेघ व्हावे,
होवुनी थेंब त्याचा हळुवार तूज स्पर्शून जावे.....
सागराच्या उंच लाटा, चुंबिती गगनास त्या,
त्या तळाच्या शिम्पल्यांचे दुखः मी हलके करावे....
अंकावरी चंद्रमाच्या, रात्र आहे पहुडलेली,
चांदण्यांनी भोगीलेले, एकांत मी मोजून घ्यावे....
गर्द मेघांनी जरी तो सूर्य आहे झाकोळलेला,
उल्केने पण का स्वतःला व्यर्थ असे जाळून घ्यावे....
वादळे सांगून गेली, व्यर्थता या जीवनाची,
मांडीलेले डाव सारे, मी कसे सोडून द्यावे.....
अंतरीचे गंध सारे, मुक्त उधळूनी वाऱ्यावरी,
झिजवुनी आयुष्य सारे, मी पुन्हा मागे उरावे....
आज या अंतिम समयी, मी असा बहरून गेलो,
कि शांत होणार्या दिव्याच्या, ज्योतीने उजळून जावे.....

Saturday, June 25, 2011

रहस्य कवितेचे माझ्या...

मला स्वतःला, कधीच कवी म्हणवून घ्यायचं नाही,
माझी कविता भोळी आहे, तिला काही सांगायचं नाही...
अधून मधून मला, काही शब्द सुचत असतात,
हृदयाच्या आत खोलवर, कुठे तरी टोचत असतात.....
बरेच असे शब्द, तसे वरवर खूप थंड दिसतात,
कधी कधी मात्र अचानकच, बंड करत असतात....
सुरु होते मनात मग, एक अनामिक लढाई,
शब्दांची भावनांवर, अन भावनांची शब्दावर चढाई..
दोघानाही वाटत, हे युद्ध आपणच जिंकाव,
अव्यक्ताला व्यक्त करायला, आपण पुढे व्हावं.....
कसा समजवायचं त्यांना, दोघानाही तितकंच महत्व,
दोघांविषयी मलाही, तितकंच वाटत असतं ममत्व....
असा करताना मग त्यांना, माझी तगमग कळते,
शब्द वळतात भावनेकडे, भावना शब्दाकडे वळते.....
एकापुढे एक असे दोघे मग, अलगद येऊन बसतात,
रसिक मित्र त्याला, मग माझी कविता म्हणतात......

Thursday, June 23, 2011

स्व-वंचना...

कधी कधी आपण स्वतःलाच फसवत असतो,
आपलं दुःख झाकण्यासाठी जगाला हसवत असतो...
माहित असतं आपल्याला, आयुष्य हे असंच असतं,
तरी सुद्धा वेदनेला, कुरवाळून बसत असतो...
आपलं सुख ओरबाडून दुसऱ्याला देताना,
एकटेपणाच विष, आपल्यातच भिनवत असतो...
आयुष्याच्या धाग्यामध्ये दुसऱ्याला ओवताना,
आपणच विणलेले धागे आपणच उसवत असतो...
एक वेळ मग अशी येते, आपलं कुणीच नसतं,
तरीही गर्दीत हरवल्याचं जगाला भासवत असतो...

प्रवास.........

आज म्हटलं पुन्हा थोडं मागे वळून पहावं,
जाण्या आधी अडगळीत, आठवणीना शोधावं......

वहीच्या पानामध्ये एक मोरपीस होतं,
अजून वेडं स्वतःशीस गोड हसत होतं..

आठवणींच एकेक पदर उघडू लागला,
गेलेला प्रत्येक क्षण पुन्हा दिसू लागला...

देवळा समोर झाडावर सूरपारंब्यांचा खेळ,
आयुष्य गुंफून टाकणारा तो थोडासाच वेळ...

आणलेली शिदोरी आम्ही येथेच सोडली,
गोड कडू वाटून घेत, साऱ्यांनीच खाल्ली...

जसे मोठे होत गेलो, सारेच मग विखुरले,
नवे रस्ते शोधताना, जुने थोडे विसरले...

आयुष्याचा प्रवास असाच चालू राहिला,
सांजवेळेचा वारा मग, हळूच वाहू लागला....

पिंपळाच्या पानाची आता जाळी झाली होती,
रंगीबेरंगी नक्षीची किनार काळी झाली होती....

मावळतीचे रंग आता आपले वाटू लागले,
हळू हळू पायही, तिकडेच चालू लागले.....

क्षितिजापारच्या जगाची ओढ वाटू लागली,
फुललेल्या फुलाची पाकळी गळू लागली...

असाच एके दिवशी सूर्य, अंधाराआड जाईल ,
वठलेल्या बुंध्यातून मग एक कोवळा कोंब येईल ...



.

बंधन.....

कधी कधी असं होतं, काहीच कळत नाही,
वणव्यात उडी मारून देखील, शल्य काही जळत नाही.....

बेधुंद पावसाच्या सारी अंगावर धावून येतात,
भावनांना पूर येतो, मात्र मन काही भरत नाही.... .

दूरच्या जळणाऱ्या दिव्यांनी, रात्रीची जाणीव होते,
तुझ्या भेटीची सांज मात्र, मनातून सरत नाही...

कित्येकदा वाटते, त्या अंधारात झोकून द्यावे,
तुझा आठव आलाकी मात्र, पाय तिकडे वळत नाही...

का अशा बंधनात, तू मला अडकून ठेवलेस?
समोरच मृत्यू दिसतोय, पण जगणे मात्र संपत नाही....

.

धरतीमाय...

भिजलेल्या श्रावणान एकदा विचारलं,
सांग आता धरती कशी रे दिसते?
क्षणभरही विलंब न लावता नी बोललो,
ती मला अगदी आई सारखी भासते...
आकाशान दिलेला प्रत्येक थेंब,
ती आपल्या कुशीत घेत असते,
माझी पण आई अगदी तशीच,
साऱ्या चुका पोटात घालत असते...

दिखावा...

आकाशात चमकणाऱ्या चांदण्यांचा
प्रकाश देण्यासाठी उपयोग नसतो,
त्यांचा दिसणारा लखलखाट,
केवळ लक्ष वेधण्यासाठी असतो...
स्वतः जळून जगाला प्रकाश देणे,
हा धर्म सुर्यानेच पाळावा,
अस्तित्व पणाला लावून जगण्यातला अर्थ,
परप्रकाशी चांदण्यांना कसा कळावा?

माझी कविता.....

माझ्या कवितेला नाव नाही,
मोठेपणाचा आव नाही,
स्वच्छंद विहरण तिला भावतं,
तिचं निश्चित कुठलं गांव नाही....
ती कधी इथे असते,
ती कधी तिथे असते,
खळखळून हसता हसता,
पटकन रुसून बसते...
तरीही जोवर ती आहे,
तोवरच मी आहे,
तिच्याशिवाय जगण्याला,
सांगा काय अर्थ आहे?

ओळख...

सूर्याच्या किरणानाही अंधाराची ओढ असते,
छोट्याश्या झरोक्यातून, ते घरामध्ये लपून बसते.....
इवल्या इवल्या वेली सुद्धा वृक्षाचा आधार होतात,
प्रत्येकाला कुठल्यातरी सहाऱ्याची गरज असते....
अवखळ ओढे नदीला भेटले कि शांत होतात,
दोघामध्ये जणू आई-मुलाचे नाते असते....
आयुष्याच्या प्रवासात, कित्येक मित्र येवून जातात,
त्यांनी जपलेली आठवण, हीच आपली ओळख असते....

खेद.......

सरतात आहे असे दिवस माझे,
कि वाहतो कुणाचे निरर्थक ओझे....
पाहुनी आरसा मला समाधान झाले,
इथे कुणाचेही न पाऊल वाजे..
तोडण्या तो पीत पक्व आम्र,
...केले कुणी दगड काळजाचे माझे....
उरात जखमा अनंत झाल्या,
त्यावरी जाहले कुणी आज राजे....
आक्रंदते ती शांतता भयाने,
बोलावती कोण नाव घेवून माझे?

Tuesday, June 21, 2011

उद्वेग.......

माणसामधलं आज, माणूसपण हरलं आहे,
मंदिर ओस पडलंय, कारागृह भरलं आहे......
चिमणी पिलं चाऱ्यासाठी दारोदार फिरत आहेत,
सडलेल अन्न उकिरड्यावर पसरलं आहे.......
पाप पुण्याची इथे कोणालाच चाड नाही,
देऊळ मात्र नवसाच्या नारळांनी भरलं आहे......
सावित्रीच कपाळ, कुंकवाला महाग होतंय,
वारांगनेच्या गळ्यात, भलं मोठं डोरलं आहे.....
ढगाकडे द्यायला, पाण्याचा थेंब नाही,
मध्यान्हीच्या सूर्याला, काजव्यांनी घेरलं आहे......
माझ्याच हातानी मी, माझी कबर खोदली,
माती लोटायला मात्र, इथ कोण उरलं आहे?

Sunday, June 19, 2011

मनातलं काही...........

मी मला पाहिल्याचं मला फारस आठवत नाही,
तसा मी इतरांच्याही आयुष्यात डोकावत नाही....

आपल्या आजूबाजूला खूप काही घडत असतं,
कुणाचं आयुष्य सरळ असतं, कुणी सारखं पडत असतं....

फांद्या नसलेला माड नारळांनी भरलेला असतो,
हवेच्या थोड्या बदलान, आंब्याचा मोहोर गळून पडतो....

वाकडी तिकडी वाट सुद्धा घराकडे सरळ नेते,
सुखाच्या मार्गाला पण कधी कधी मरगळ येते...

उभे खडे कडे, लंगडे सहज चढून जातात,
केवळ एका स्पर्शानेही मुके सारे बोलून जातात...

चाकोरीतच चालायचं,असा काही ठरलेलं नसतं,
भरलेल्या ताटात सुद्धा, खायला काही उरलेलं नसतं...

परिस्थितीला समोर जाण, हाच एक मार्ग असतो,
विषातही अमृत पाहिलंत,तर इथेच सारा स्वर्ग असतो...



.

तरीही " मेरा भारत महान......."

सूर्याची आता कोणालाच गरज नाही,
सगळीकडे काजव्यांच राज्य आहे,
कृत्रिम दिव्यांच्या या लखलखाटात,
त्याचं अस्तित्वहि आता त्याज्य आहे...

बुरुजावर फडकाताहेत अंधाराचे झेंडे,
सायंकाळ भिकारणीसारखी भटकते आहे,
खुल्या बाजारात मान खाली घालून,
प्रकाशाची अब्रू भरदिवसा लटकते आहे...

एरंडाचाच आता इथे दिमाख आहे,
कल्पवृक्षाचा त्यांना भाव आला,
सुखाची फळे त्यांनीच चाखली,
ज्यांनी चढवल्या त्यांना फुलमाला..

सत्यवचनी असलेल्या साऱ्यांना फक्त,
इथे अपमानच सहन करावा लागतो,
जगाच्या डोळ्यात धूळ फेकणाऱ्याना,
पावलोपावली सलाम करावा लागतो...

अंधार नगरीच्या या सम्राटांच्या पुढे,
शुक्राच्या चांदणीलाही नाचावं लागतंय,
जगाच्या उद्धारासाठी लढणार्यांना,
भ्रष्टाचाराच विष पचवावं लागतंय......

प्रत्येक वीराचा इथे दगड झाला आहे,
कुठूनही एक फुत्कार उमटत नाही,
निष्क्रियतेची पट्टी डोळ्यावर ठेवून
कधीही कोणता प्रश्न सुटत नाही....

बहरलेल्या झाडांना इथे किंमत नाही,
वठलेल्यांची मात्र पूजा होते आहे,
लाचाराना इथे सत्तेचे बक्षीस मिळते,
स्वाभिमानी साऱ्यांना सजा होते आहे...



.

मला वाटतं...

जगता जगता मरावं कि मरता मरता जगू द्यावं,
झाडाखाली पडलेलं, प्रत्येक फुल मग वेचून घ्यावं.....

आपले कुणी नसले तरी, दुसरे सारे आपलेच असतात,
आपलं पुस्तक मिटून, आपण त्यांचंच पुस्तक वाचून घ्यावं.....

आपलं माणूस शोधण्यामध्ये, सगळं आयुष्य निघून जातं,
आपल्या मनाला बोचणारं सारं, आपल्याच मनाला सांगावं.....

भरून आलेले ढग सुद्धा अश्रू ढाळून हलके होतात,
आपण मात्र डोळ्यातलं पाणी, पापणी मध्येच वाळू द्यावं.....

आठवणींचे ओहाळ अजून चहुबाजूनी वाहतच आहेत,
तुझ्यासाठी वाटतं त्यांना, असंच कायम वाहू द्यावं........



.

आव्वाज नकोय...

आता तू रोजच्या सारखा, त्रास मला देवू नको,
माझ्याशी बोलता बोलता, दुसरीकडे पाहू नको.....
इतर सगळ्या कितीही असोत, मी इथे एकटीच आहे,
अपर्णा गोरी असली, तरी माझ्यापेक्षा नकटीच आहे...
ती गौरी तर कायम गौरी सारखी घुमत असते,
चार पावलं चालली नाहीत, तोवर लगेच दमत असते...
प्राची तर अशी आहे, अंधारात फक्त दात दिसतात,
चेहऱ्यावर कायम तिच्या, पावडरचे थर असतात..
कल्याणीच सांगू नको, ती तुला पटणार नाही,
तिच्या बरोबर हिंडणं, तुझ्या खिशाला झेपणार नाही..
मला सुद्धा अरे, त्या प्रतिक बरोबर जाता येईल,
पण मी गेले तर सांग, तुझ्याकडे कोण पाहिल?
सांगायचं तात्पर्य इतकंच,तुला हवं ते घडणार नाही,
कितीही तू प्रयत्न कर, पण मी तुला सोडणार नाही.....



.

प्रश्न...

केलेत बंद त्यांनी खिडक्या गवाक्ष दारे,
बाहेर मुक्त वारा, त्यांना उगा पुकारे...

धारा सहस्त्र ओल्या अंगावरून गेल्या,
कोरड्या मनात माझ्या फुलतात का निखारे.....

पाऊस माणसांचा तो कोसळे निरंत,
कोणीच आत नाही, कि गेले लयास सारे?

मी आज प्रश्न माझे, शोधिले उत्तरात,
काहीच आकळेना, झालेत शब्द कोरे....

कारण तो माझा बाप होता....

दोनच सदरे आणि दोनच विजारी,
एव्हढ्यावर सारे वर्ष साजरे करी,
तो माझा बाप होता.........

कष्टाने रापलेली ती राकट काया,
डोळ्यात मात्र असायची अपर माया,
तो माझा बाप होता.........

पोरांवर कधी हात टाकला नाही,
पैशासाठी स्वाभिमान विकला नाही,
तो माझा बाप होता.........

साऱ्यांच्या सुखासाठी रात्रंदिवस झटला,
आपला सारा आनंद, दुसर्यांना वाटला,
तो माझा बाप होता........

स्वतः मीठाबरोबर भाकरी खाल्ली,
पोरांना मात्र भाजीची सोय केली,
तो माझा बाप होता.......

पोरांच्या गरजेला सारे काही दिले,
प्रसंगी आपले औषध बाजूला ठेवले,
तो माझा बाप होता.........

परिस्थितीचे चटके स्वतःवर घेतले,
आपल्या हाताने आमचे पाय चेपले,
तो माझा बाप होता......

सगळे त्याला गृहीत धरत होते,
त्यालाही हे सारे कळत होते,
तो माझा बाप होता....

आंब्याच ते एक डेरेदार झाड होतं,
स्वतः तापून आम्हाला सावली देत होतं,
तो माझा बाप होता.......

त्याच्या हातात हात, कि सारं सोप्पं असायचं,
काळ्याकुट्ट काळोखात, सगळं लख्ख दिसायचं,
तो माझा बाप होता........

कोसळत्या पावसात तो छप्पर झाला होता,
घोंगावणार्या वादळात त्याचाच आधार होता,
तो माझा बाप होता....

आमच्या यशात त्याचाच वाटा होता,
आमच्या मागे त्याच्या पुंण्याचा साठा होता,
तो माझा बाप होता......

उगवता सूर्य, त्यानेच तर दाखवला,
जगण्याचा अर्थ, त्यानेच तर शिकवला,
तो माझा बाप होता.....

तो होता तोवर, त्याचे महत्व कळले नाही,
त्याच्या कवचामुळे आमचे हात पोळले नाही,
तो माझा बाप होता.......

आज जेंव्हा हे सारं उमजत आहे,
बाप काय असतो, थोडंसं समजत आहे.......
बापा सारखा बापच, दुसरा कोणी असणार नाही,
त्याच्या सारखी माया, दुसरा करू शकणार नाही...
बापाला मोजायला कोणतीच पट्टी नसते,
आभाळाची भव्यता, सागराची खोली असते...
एव्हढ्याशा शब्दात तो असा मावणार नाही,
त्याचे उपकार फेडायला जन्महि पुरणार नाही....

कारण? कारण तो माझा बाप होता..........

मी एकटा....

एकटीच रात्र आहे,
एकटाच दिवस आहे,
एकटेपणाच ओझं घेवून,
जगणारा मी एकटा आहे....
ऋतूहि एकटेच आहेत,
वर्षेही एकटीच आहेत,
आषाढात बरसणारे,
अश्रूही एकटेच आहेत....
घरही एकटेच आहे,
रस्ते हि एकटेच आहेत,
आठवणींचे येणारे,
कढही एकटेच आहेत.....
आयुष्यहि एकटे आहे,
मृत्यूही एकटा आहे,
रात्री सोबत देणारा,
चंद्रही एकटा आहे.....
एकट्या अशा वाटेवर,
चालणारा मी एकटा आहे,
शब्दांच्या या साम्राज्यात,
शब्द माझा एकटा आहे....

Saturday, April 16, 2011

पुन्हा...

आयुष्याच्या एका अनोख्या वळणावर,
जेंव्हा तू मला भेटलीस,
उगाचच आठवला भूतकाळ,
वर्तमानावर मत करणारा,
आणि भविष्य झाकोळणारा....
तुझी गती काळाची होती,
त्याच काळाने मला मात्र थांबवले,
आजही मी तिथेच आहे,
निर्जीव.... निश्चल....
वर्तमान विसरून.....
भविष्याकडे पाठ फिरवून....
सलतात ऊरात त्या जुन्या जखमा...
अजूनही......
ओल्या आणि रक्ताळलेल्या....
तशाच मनावर बाळगतोय...
तुझी आठवण जागविण्यासाठी,
अशीच कधीतरी पुन्हा एकदा
एखाद्या वळणावर तू दिसलीस,
तर या जखमांच्या पायघड्या घालून,
तुझ्या पावलांची होरपळ कमी व्हावी म्हणून........

Monday, April 11, 2011

आपण दोघं...

आपल्या दोघांत आता नातं असं उरलं नाही,
आयुष्यभर जवळ राहून, अंतर कधीच सरलं नाही...
एकाच ध्येयाकडे जाताना मार्ग मात्र समांतर होते,
एकमेकांच्या आयुष्यात कधीच डोकावून पाहिलं नाही....
टेकडीवरच्या मोकळ्या हवेत, आपले श्वास कोंडले होते,
सोसाट्याच्या वाऱ्यात, पण पान देखील हललं नाही...
विस्कटलेल्या आयुष्याचे तुकडे गोळा करता करता,
सगळंच निसटून गेलं, हाती काहीच उरलं नाही....
कोण चुकलं, कोण बरोबर, हिशोब कशाला मांडायचा?
कोणत्याच गणिताचं उत्तर, कधीच बरोबर आलं नाही...
काय विसरायचं, काय आठवायचं? समोर फक्त प्रश्नच आहेत,
अवघं माणूस शोधून पाहिलं, अजून उत्तर सापडलं नाही...

Tuesday, March 1, 2011

तुझ्याचसाठी..

उगाच तुझ्या प्रतीक्षेत, कण कण झुरत होतो,
" नसलेल्या " तुझ्या साठी, वणवण फिरत होतो...

तुझं " असणंही " नेहमी, माझ्यासाठी " नसणं " होतं,
जागा समोर हसताना, आतून मात्र रडत होतो....

ओल्या कुंद संध्याकाळी, किंचित तरी तिरीप येईल,
या एकाच आशेवर, आजवर मी जगत होतो....

रक्ताळलेल्या या जखमांवर फुंकर घालशील म्हणून,
भेगाळलेल्या पायांनी तुला दारोदार शोधत होतो.....

तुझं दिसणं हेच माझ्या जगण्याच कारण होतं,
जगण्यासाठी धडपडताना, प्रत्येक क्षणी मरत होतो....

जेंव्हा सारा उमजलं तेंव्हा, बराच उशीर झाला होतां,
त्रिशंकू सारखा तुझ्या आयुष्यात अधांतरी लटकत होतो...

Friday, February 18, 2011

कारण शेवटी बाकी शून्य उरते....

कधीतरी आयुष्यात असं काही घडतं
सावरायालाही वेळ मिळत नाही,
प्रलयाची लाट रोंरावत येते,
आयुष्यभर जपलेलं, काहीच उरत नाही.....

कुणीतरी आपला जीवाचं माणूस असतं
दुसरंच कोणी तरी त्याला ओढू पाहत,
काळजाच्या कप्प्यात जीवापाड जपलेलं
बळेच त्याला बाहेर काढू पाहत....

ती काळजाची वीण तुटताना
जीवाला ज्या यातना होतात,
तोडणाऱ्याला काहींच देणं घेणं नसतं,
त्या दोन जीवांचे मात्र हाल होतात....

सगळं कसं निमुटपणे सोसायचं
आपल्याला कोणताच आधार नसतो,
आपली तशी वृत्तीच नसते
आपल्याकडे भावनेचा व्यापार नसतो...

आयुष्याच्या जमापुंजीतून सारखी
अशी वजाबाकी होतंच राहते,
मात्र हिशोब कधीच मांडायचा नाही
कारण शेवटी बाकी शून्य उरते....

Thursday, February 17, 2011

कधी कधी असं होतं.......

कधी कधी असं होतं, काहीच कळत नाही,
वणव्यात उडी मारून देखील, शल्य काही जळत नाही.....

बेधुंद पावसाच्या सारी अंगावर धावून येतात,
भावनांना पूर येतो, मात्र मन काही भरत नाही.... .

दूरच्या जळणाऱ्या दिव्यांनी, रात्रीची जाणीव होते,
तुझ्या भेटीची सांज मात्र, मनातून सरत नाही...

कित्येकदा वाटते, त्या अंधारात झोकून द्यावे,
तुझा आठव आलाकी मात्र, पाय तिकडे वळत नाही...

का अशा बंधनात, तू मला अडकून ठेवलेस?
समोरच मृत्यू दिसतोय, पण जगणे मात्र संपत नाही....

Tuesday, February 15, 2011

मी आता नसणार आहे...

जाणले होते मी, हे असेच होणार आहे,
मृत्युनंतरही मी एकटा असणार आहे...

विस्कटले हृदय, मी एकला आक्रन्द्लो,
कोणास माझ्या वेदनेची, जाणीव ती असणार आहे?

दुःख ते वाहून गेले, जखमा ओल्याच राहिल्या,
तिरस्काराने तुझ्या मी घाव ते भरणार आहे..

भासले कोणीतरी, चाहूल मजला लागली,
वेळ पण निघून गेली, मी आता नसणार आहे...

तिमिरात चांदण्यांची.....

तिमिरात चांदण्यांची ओंजळ नभी सांडली,
प्रिया आज थोडी भेट आहे लांबली.

मौनातले तुझ्या मी अर्थ सारे जाणले,
हृदयातील तव मी हाक आहे ऐकिली.

वाटे तुझ्यामध्ये मी असे एकरूप व्हावे,
देह दोन तरी, एक व्हावी सावली.

माझ्याच या सुखाचा मज वाटतो रे हेवा,
मैफिल जीवनाची तालासुरात रंगली.