Sunday, June 19, 2011

कारण तो माझा बाप होता....

दोनच सदरे आणि दोनच विजारी,
एव्हढ्यावर सारे वर्ष साजरे करी,
तो माझा बाप होता.........

कष्टाने रापलेली ती राकट काया,
डोळ्यात मात्र असायची अपर माया,
तो माझा बाप होता.........

पोरांवर कधी हात टाकला नाही,
पैशासाठी स्वाभिमान विकला नाही,
तो माझा बाप होता.........

साऱ्यांच्या सुखासाठी रात्रंदिवस झटला,
आपला सारा आनंद, दुसर्यांना वाटला,
तो माझा बाप होता........

स्वतः मीठाबरोबर भाकरी खाल्ली,
पोरांना मात्र भाजीची सोय केली,
तो माझा बाप होता.......

पोरांच्या गरजेला सारे काही दिले,
प्रसंगी आपले औषध बाजूला ठेवले,
तो माझा बाप होता.........

परिस्थितीचे चटके स्वतःवर घेतले,
आपल्या हाताने आमचे पाय चेपले,
तो माझा बाप होता......

सगळे त्याला गृहीत धरत होते,
त्यालाही हे सारे कळत होते,
तो माझा बाप होता....

आंब्याच ते एक डेरेदार झाड होतं,
स्वतः तापून आम्हाला सावली देत होतं,
तो माझा बाप होता.......

त्याच्या हातात हात, कि सारं सोप्पं असायचं,
काळ्याकुट्ट काळोखात, सगळं लख्ख दिसायचं,
तो माझा बाप होता........

कोसळत्या पावसात तो छप्पर झाला होता,
घोंगावणार्या वादळात त्याचाच आधार होता,
तो माझा बाप होता....

आमच्या यशात त्याचाच वाटा होता,
आमच्या मागे त्याच्या पुंण्याचा साठा होता,
तो माझा बाप होता......

उगवता सूर्य, त्यानेच तर दाखवला,
जगण्याचा अर्थ, त्यानेच तर शिकवला,
तो माझा बाप होता.....

तो होता तोवर, त्याचे महत्व कळले नाही,
त्याच्या कवचामुळे आमचे हात पोळले नाही,
तो माझा बाप होता.......

आज जेंव्हा हे सारं उमजत आहे,
बाप काय असतो, थोडंसं समजत आहे.......
बापा सारखा बापच, दुसरा कोणी असणार नाही,
त्याच्या सारखी माया, दुसरा करू शकणार नाही...
बापाला मोजायला कोणतीच पट्टी नसते,
आभाळाची भव्यता, सागराची खोली असते...
एव्हढ्याशा शब्दात तो असा मावणार नाही,
त्याचे उपकार फेडायला जन्महि पुरणार नाही....

कारण? कारण तो माझा बाप होता..........

No comments:

Post a Comment