Saturday, June 25, 2011

रहस्य कवितेचे माझ्या...

मला स्वतःला, कधीच कवी म्हणवून घ्यायचं नाही,
माझी कविता भोळी आहे, तिला काही सांगायचं नाही...
अधून मधून मला, काही शब्द सुचत असतात,
हृदयाच्या आत खोलवर, कुठे तरी टोचत असतात.....
बरेच असे शब्द, तसे वरवर खूप थंड दिसतात,
कधी कधी मात्र अचानकच, बंड करत असतात....
सुरु होते मनात मग, एक अनामिक लढाई,
शब्दांची भावनांवर, अन भावनांची शब्दावर चढाई..
दोघानाही वाटत, हे युद्ध आपणच जिंकाव,
अव्यक्ताला व्यक्त करायला, आपण पुढे व्हावं.....
कसा समजवायचं त्यांना, दोघानाही तितकंच महत्व,
दोघांविषयी मलाही, तितकंच वाटत असतं ममत्व....
असा करताना मग त्यांना, माझी तगमग कळते,
शब्द वळतात भावनेकडे, भावना शब्दाकडे वळते.....
एकापुढे एक असे दोघे मग, अलगद येऊन बसतात,
रसिक मित्र त्याला, मग माझी कविता म्हणतात......

No comments:

Post a Comment