Sunday, June 19, 2011

तरीही " मेरा भारत महान......."

सूर्याची आता कोणालाच गरज नाही,
सगळीकडे काजव्यांच राज्य आहे,
कृत्रिम दिव्यांच्या या लखलखाटात,
त्याचं अस्तित्वहि आता त्याज्य आहे...

बुरुजावर फडकाताहेत अंधाराचे झेंडे,
सायंकाळ भिकारणीसारखी भटकते आहे,
खुल्या बाजारात मान खाली घालून,
प्रकाशाची अब्रू भरदिवसा लटकते आहे...

एरंडाचाच आता इथे दिमाख आहे,
कल्पवृक्षाचा त्यांना भाव आला,
सुखाची फळे त्यांनीच चाखली,
ज्यांनी चढवल्या त्यांना फुलमाला..

सत्यवचनी असलेल्या साऱ्यांना फक्त,
इथे अपमानच सहन करावा लागतो,
जगाच्या डोळ्यात धूळ फेकणाऱ्याना,
पावलोपावली सलाम करावा लागतो...

अंधार नगरीच्या या सम्राटांच्या पुढे,
शुक्राच्या चांदणीलाही नाचावं लागतंय,
जगाच्या उद्धारासाठी लढणार्यांना,
भ्रष्टाचाराच विष पचवावं लागतंय......

प्रत्येक वीराचा इथे दगड झाला आहे,
कुठूनही एक फुत्कार उमटत नाही,
निष्क्रियतेची पट्टी डोळ्यावर ठेवून
कधीही कोणता प्रश्न सुटत नाही....

बहरलेल्या झाडांना इथे किंमत नाही,
वठलेल्यांची मात्र पूजा होते आहे,
लाचाराना इथे सत्तेचे बक्षीस मिळते,
स्वाभिमानी साऱ्यांना सजा होते आहे...



.

1 comment:

  1. swatanantravir savarkaranchi aathavan jagi zali
    mitra khup chan

    ReplyDelete