Tuesday, December 10, 2013

आयुष्य…….

नको पाहूस जगाकडे अशा तिरकस नजरेने,
केवळ दोष आणि दुर्गुण शोधण्यासाठी,
कांहीवेळा आपण अंधच असावे,
शोधावी फुलेच फक्त
काट्याकडे दुर्लक्ष करुन…
मेघाच्छादित रात्रीत सुद्धा एक किरण लपलेला असतो
स्वयंप्रकाशित ताऱ्याचा
त्या ताऱ्याला शोध,
लक्ष नको देवू सूर्यावरील डागाकडे….
नदीचा प्रवाह वाहत असतो,
अथांग सागराकडे,
सामावून घेतो तो,
नदीतले सारे सारे,
नाही लोटत मागे तो नकोसे प्रवाह,
त्यांना सामावून घेत,
नष्ट करतो त्यातले सारे विष,
नको जावूस प्रवाहा विरुद्ध,
आणि प्रयत्नहि करू नको त्याला थांबविण्याचा,
आत्ताच आला आहेस तू या जगात,
नदी सागराचे अस्तित्व तुझ्या खूप आधीपासूनचे आहे,
प्रत्येक संकटाला तोंड देत,
ते अजूनही अबाधित आहे,
जग तुझ्यासाठी बदलणार नाही,
किंवा नदी सागराकडून जमिनीकडे वाहणार नाही,
आयुष्यात संकटे हि यायलाच हवीत,
आपली खरी कुवत समजण्यासाठी,
परिस्थितीला सामोरे जा,
नको भिवून मागे फिरू,
आणि आयुष्य हि जग पाण्यासारखे,
भांड्याचा आकार कोणताही असो,
त्याचा आदर करून,
आणि त्याचाच आकार घेवुन….

No comments:

Post a Comment