आई-बाबा सांगाना, तुम्ही असं का केलंत?
जगाच्या पसाऱ्यात, आम्हाला एकट सोडून दिलंत..
आम्ही असं काय केलं? म्हणून आम्हाला ही शिक्षा दिली?
आम्हावर केलेल्या प्रेमाची अशी परीक्षा का घेतली?
स्वप्नांचे मनोरे रचायला अजून सुरुवातही केली नाही,
आणि जगात उभं राहण्याची तयारीही झाली नाही..
छोटू किती लहान आहे, अजून चालूही शकत नाही,
आणि आयुष्य पेलण्याची, अजून माझ्यात ताकद नाही..
आमच्या साठी तुम्ही दोघ, सारं काही करत होता,
फक्त आमच्या सुखासाठी, रात्रंदिवस राबत होता...
तुम्हाला चिंता असावी आपल्या बाळांच कसं होईल,
पण दयेवर जगताना आता, आमची अवस्था काय होईल?
समजत होतं आम्हाला, आपल्याकडे फार काही नव्हतं,
पण आम्हालाही तुमच्या शिवाय, दुसरं काही नको होतं...
सगळेच आई-बाबा असं करतात? मला तसं वाटत नाही,
तुम्हीच असं का केलंत, मला अजून समजत नाही..
सांगाना बाबा? आता आम्ही काय करायचं?
कोणत्या आधारावर जगायचं? कि तुमच्याकडेच यायचं?
या घराला आता फक्त पडक्या भिंती उरल्या आहेत,
कोसळलेल्या छपराखाली, साऱ्या आकांक्षा पुरल्या आहेत....
उजळणार्या पूर्वेला माझी सतत नजर होती,
आणि याचवेळी, आम्हाला तुमची खूप गरज होती...
फार काही भव्य स्वप्ने मी पाहत नव्हतो,
तुम्हाला अभिमान वाटेल, अशाच गोशी करत होतो...
तुम्हीतर निघून गेलात, परत काही येणार नाही,
पण छोटुला कसं समजावू? त्याला हे पटणार नाही...
व्हायचं ते होऊन गेलं, आता रडून उपयोग नाही,
हेच खरं कि तुमच्या आधाराचा, माझ्या नशिबात योग नाही....
आता मला दुख्खाला आवर घालायलाच हवा...
अन्कुरणाऱ्या त्या कोम्बाला, भक्कम आधार द्यायला हवा..
झाड आणि वेली सारखे, एकमेकांना आधार देवू,
आयुष्याच्या नौकेला, या वादळातूनहि पार नेवू..
तुमचे आशीर्वाद असल्यावर पायात हत्तीचे बळ येईल,
तुम्ही लावलेल्या रोपांना, निर्मळ यशाचे फळ येईल...
आई, बाबा, तुमचे संस्कार वाया जावू देणार नाही,
संकटाना भिवून, कधीच माघार घेणार नाही...
कधीच माघार घेणार नाही.....
Apratim Kavita Prathmeshji
ReplyDelete