Wednesday, January 1, 2014

व्यथा....

दंगे धोपे,

मोर्चे, बंद....
इकडं भ्रष्टाचार, तिकडे आग,
लाचार वृध्दत्व,
जागोजागी उसवलेलं,
सामान्य माणसाचा भविष्य,
त्रिशंकू सारखं,
नेत्यांची गुंडगिरी,
सत्तेची हाव,
जमेल तिथे हात मारून,
धनान भरली बाव,
सत्तेची अमर्याद धुंदी,
सर्वाना नाचवतेय,
महागाईचं विष,
जनता पचवतेय.....
नाही होत सहन हे सारं.....
न दिसणाऱ्या जखमेतून
भळाभळा रक्त वाहतंय,
चेहऱ्यावर नकली हसू
जगण्यासाठी ठेवायचं,
षंढ नेतृत्व,
धडपडतंय स्वतःची अब्रू झाकायला
फाटक चरित्र घेवून,....
डोक्यावर घेतलंकी,
पाय उघडे पडतात,
पाय झाकावे तर,
खोटा मुखवटा दिसतोय,
कोणालाच फिकीर नाही,
जगण्यासाठी मरणाऱ्या,
सामान्य जीवाची,
दिवसाढवळ्या सर्वासमक्ष,
बलात्कार होतोय देशावर,
त्याला सांभाळणाऱ्या नेत्याकडूनच,
कोठे तक्रार करणार?
कुंपणच शेत खातंय,
करोडो हात आहेत इथे,
पण अजूनही ते उठत नाहीत
दोन हात करायला,
जणू कोणी ते छाटून टाकलेत...
कोणताच उरलेली नाही,
अन्याया विरुद्ध आग,
पेटण्या आधीच ती विझून जातेय.....
पण कोठे तरी एक ठिणगी,
अजूनही शिल्लक आहे,
जमेल तितकं पेटवण्याची,
अजूनही साहस करतेय
हे सारं संपविण्यासाठी,
एकत्र आणायला हव्यात या ठिणग्या....
ती पहा परत एकदा,
दारावर टकटक होतेय,
उभे आहेत दरवाज्यात तुमच्या,
ते पवित्र आत्मे,
ज्यांनी या देशाला मुक्त केलं,
पारतंत्र्याच्या जोखडातून,
आज पुन्हा ते भीक मागताहेत,
स्वतंत्र भारताच्या स्वातंत्र्याची,
कारण आज आपलं स्वातंत्र्य,
नेत्यांनी काबीज केलंय,
झालीय आपली कठपुतळी,
दोऱ्या ओढल्या कि नाचणारी,
खेळसंपे पर्यंत आपलं अस्तित्व,
खेळ संपल्यानंतर पुन्हा जाणार,
त्या जनता नावाच्या अडगळीत,
मग पुढे पाच वर्ष,
कितीही रडा, कितीही टाहो फोडा,
नाहीत पोचणार आपले आवाज,
पुढचा खेळ येई पर्यंत...
कुठे थांबणार हे?
कोण थांबवणार?
कोण?

No comments:

Post a Comment