Thursday, January 16, 2014

सामान्य......

दिवस फक्त वेगळा असतो,
वर्ष सुद्धा वेगळ असतं,
जगण्यासाठी लढणार्याला,
त्यात काही वेगळं नसतं......

रोजचीच ती धावपळ,
सकाळी लवकर उठायचं,
जगण्यासाठी सगळा दिवस,
मर मर मरायचं......

तेच तेच रस्ते असतात,
तेच तेच चेहरे,
कुठून भरायचे रोज वेगळे,
स्वप्नात रंग गहिरे ?

प्रत्येक चौकात लाचार पोरं,
भिक मागत उभी असतात,
एक रुपया द्यायलापण,
मोठे हात मागे फिरतात......

घरी आल्यावर पोरं,,
खाऊसाठी हात पसरतात,
वैतागलेले आईबाप,
पोरांवरच बरसतात...

पोरांना कशी कळावी,
आई-बापाची धडपड,
निष्पाप कोवळे जीव ते,
त्यांचीच खरी होते परवड....

आई बाप भेटत नाहीत,
कोणाचाही आधार नसतो,
डोळ्यातलं पाणी पुसायला,
आईचा पदर नसतो.....

कितीही कमावलं तरी,
झोळीत काही साठत नाही,
रोजचं पोट भरता भरता,
शिल्लक काही पडत नाही...

जगात सुद्धा पैशाशिवाय,
काहीही मिळत नाही,
माणुसकी तर गायबच झालीय,
पण माणूस सुद्धा मिळत नाही....

जगणं इतकं कोरडं झालंय,
स्वप्नं सुद्धा पडत नाहीत,
खुरटलेलं रोपट,
काही केल्या वाढत नाही...

शेवटी स्वप्न हे स्वप्नच असतं,
वास्तव खूप वेगळं,
रोजच्या दोन घासासाठी,
सोसायचं हे सगळं......

No comments:

Post a Comment