Monday, January 20, 2014

माणसास....

अरे माणसा माणसा, जग तसेच राहूदे,
पाणी नको रे अडवू, त्याला तसेच वाहुदे...

पाणी अडले भिंतीत, खाली गावे तहानली,
गुदमरे जीव माझा, साठलेल्या पाण्याखाली....

तुझी हाव न शमली, किती झाडे तू तोडली,
झाली जंगले उजाड, वाट पावसाची अडली...

तूच एकला का इथे? कितीतरी येथे जीव,
सारे जगती सुखाने, तुझी संपे न का हाव?

वीतभर जीभे साठी, मारी जीव का निष्पाप,
घडे भरशी पापाचे, याला नाही रे उःशाप......

फुले तोडीशी अपार, सजवण्या तुझे घर,
बाह्य सजणे कशाला? ठेव मन तू सुंदर...

फुल नाहीरे फुलत, दावण्यास त्याचे रूप,
त्याचा धर्मच फुलणे, गंध उधळे अमोप....

झाली जंगले उजाड, आता पाऊस पडेना,
कळे सारे रे तुजला, समजून उमजेना...

तू नाहीरे निर्मिला, या जगाचा पसारा,
नाही तुला अधिकार, बदलण्या तो चेहरा.....

हाच निसर्ग साऱ्यांना, घेई पदराच्या खाली,
दुखावले जरी त्याला, तो न तोडतो सावली....

देणे निसर्गाचे तुला, सदा मिळत राहते,
केली काही जरी चूक, माया अखंड वाहते....

राहा आनंदाने तू, कमी तुला न कशाची,
झोळी राही भरलेली, चिंता कर न उद्याची....

जन्म एकच मिळे, त्याचे सार्थक होवू दे,
जगण्यास इतरांना, तुझा आधार होवू दे...

No comments:

Post a Comment